News Flash

प्रो कबड्डीच्या किमयागाराची ८१.७५ लाख कमाई

पाटणा पायरेट्सचा विक्रमवीर प्रदीप नरवालला हंगामात ३५ विविध पुरस्कार

पाटणा पायरेट्सचा विक्रमवीर प्रदीप नरवालला हंगामात ३५ विविध पुरस्कार

प्रो कबड्डी लीगच्या प्रदीर्घ हंगामात यंदा हॅट्ट्रिक साजरी करणाऱ्या पाटणा पायरेट्सच्या प्रदीप नरवालने आपल्या तेजस्वी कामगिरीने छाप पाडली आहे. २६ सामन्यांत विक्रमी ३६९ गुण मिळवणाऱ्या या प्रो कबड्डीच्या किमयागाराने पाचव्या हंगामात एकंदर ३५ विविध पुरस्कारांवर नाव कोरले आहे. प्रो कबड्डीच्या लिलावातील रकमेसह त्याने यंदा एकूण ८१ लाख ७५ हजार रुपयांची कमाई करीत क्रीडाक्षेत्राचे लक्ष वेधून घेतले आहे.

पाटणा पायरेट्सने या वर्षी सलग तिसऱ्यांदा आपली प्रो कबड्डीवरील मक्तेदारी सिद्ध केली. या त्यांच्या यशात प्रदीपचा सिंहाचा वाटा आहे. त्याने संघाच्या २६ सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले. पाटण्याने संपूर्ण स्पध्रेत एकंदर १०५० चढायांचे गुण मिळवले. यात जवळपास एकतृतीयांशहून अधिक वाटा हा एकटय़ा प्रदीपचा आहे. पाटण्याला अनेक अशक्यप्राय विजय मिळवून देणाऱ्या प्रदीपने या स्पध्रेत २६ वेळा अव्वल चढाया केल्या. यापैकी हरयाणा स्टीलर्सविरुद्धच्या ‘एलिमिनेटर्स-२’ सामन्यात प्रदीपने एका सामन्यात सर्वाधिक गुण आणि प्रतिस्पर्धी संघाचे सहा खेळाडू बाद करण्याची किमया साधली होती.

प्रदीपला नेतृत्वाची धुरा सोपवून पाटणा पायरेट्सने आपल्या संघात कायम ठेवल्यामुळे लिलावाच्या नियमानुसार त्याला फक्त ५५ लाख रुपये मानधनापर्यंतच उंची गाठता आली. कारण संघात कायम ठेवलेल्या खेळाडूचे मानधन लिलावातून मिळवलेल्या सर्वाधिक रकमेच्या खेळाडूपेक्षा १० टक्के अधिक असणार होते. पाटण्याने बचावपटू जयदीपसाठी ५० लाख रुपये मोजले आणि लिलावातील अर्थकारण मर्यादित ठेवले. त्यामुळे त्यांना प्रदीपला कायमही ठेवता आले आणि फारसा महागातही तो पडला नाही.

गुजरात फॉच्र्युन जायंट्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात प्रदीपने सामन्यातील परिपूर्ण चढाईपटू, अव्वल चढाया गाजवणारा, सामन्यातील कलाटणीचा क्षण आणि विजयी संघाचा सर्वोत्तम खेळाडू असे चारही पुरस्कार पटकावले. याचप्रमाणे स्पध्रेतील मौल्यवान खेळाडूचा १५ लाखांच्या किताबावरही नाव कोरले.

ंप्रो कबड्डीचा यंदाचा हंगाम पाटणा पायरेट्ससाठी संस्मरणीय ठरला. माझा अप्रतिम फॉर्म संघाच्या यशासाठी पूरक ठरला, याचा मला अतिशय आनंद होतो आहे. वर्चस्वपूर्ण सांघिक कामगिरीमुळे पाटण्याला पुन्हा एकदा विजेतेपदाला गवसणी घालता आली. याशिवाय मिळालेले वैयक्तिक पुरस्कार हे नेहमीच मला प्रेरणादायी ठरतात. आपण योग्य वाटेवर आहोत, याची खात्री देतात. पाटण्याच्या कामगिरीमुळे तरुणवर्गाला या खेळाविषयीचे आकर्षण अधिकाधिक वाढेल, अशी आशा आहे. -प्रदीप नरवाल, पाटणा पायरेट्सचा कर्णधार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 2:16 am

Web Title: pradeep narwal income pro kabaddi 2017 patna pirates
Next Stories
1 Ranji Trophy : मयंक अग्रवालच्या साक्षीनं प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्रिशतकांची पन्नाशी!
2 Womens Asia Cup Hockey : भारतीय महिलांची फायनलमध्ये धडक, जपानचा ४-२ ने धुव्वा
3 राष्ट्रकुल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय त्रिकुटांची ‘लक्ष्यभेदी’ कामगिरी
Just Now!
X