आपल्या घरच्या मैदानावर खेळणाऱ्या दबंग दिल्लीच्या संघाने यंदा आपल्या हक्काच्या प्रेक्षकांना नाराज केलं आहे. इंटर झोन स्पर्धेत तेलगू टायटन्सने दबंग दिल्लीवर ४४-२२ अशा मोठ्या फरकाने मात करत आपलं चौथं स्थान कायम राखलं आहे. दंबग दिल्लीने मात्र आजही निराशाजनक खेळाची मालिका सुरुच ठेवली.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 5 – यू मुम्बाच्या विजयात सांगलीचा काशिलींग अडके चमकला

तेलगू टायटन्सकडून कर्णधार राहुल चौधरीने आजच्या सामन्यात चढाईत सर्वाधीक १६ गुणांची कमाई केली. त्याला मोहसीन मग्शदुलूने ७ तर निलेश साळुंखेने ५ गुणांची कमाई करत चांगली साथ दिली. राहुलच्या आजच्या खेळात अनेक सुपर रेडचा समावेश होता. तेलगूच्या चढाईपटूंच्या आक्रमक खेळापुढे दबंग दिल्लीच्या बचावफळीचा निभाव लागला नाही.

चढाईपटूंप्रमाणे बचावफळीतल्या खेळाडूंनीही आज सर्वोत्तम कामगिरी करत तेलगू टायटन्सच्या संघात आपला हातभार लावला. डावा कोपरारक्षक विशाल भारद्वाजने सामन्यात सर्वाधीक ४ बळी मिळवले. त्याला त्याला फरहाद, रोहित आणि सोमबीर या त्रिकुटाने मिळून ६ गुणांची कमाई करत चांगली साथ दिली. तेलगूने आज शेवटच्या मिनीटापर्यंत आपल्या बदली खेळाडूंना संघात खेळायची संधी दिली नाही. यावरुन त्यांनी सामन्यावर घेतलेल्या पकडीचा अंदाज येत होता.

दबंग दिल्लीकडून अबुफजल मग्शदुलूने सामन्यात सर्वाधीक ७ गुणांची कमाई केली. त्याला रोहीत बलियानने ४ गुणांची कमाई करत चांगली साथ दिली. मात्र तेलगूच्या आक्रमक खेळापुढे हे दोन्ही खेळाडू आपल्या कामगिरीत सातत्य राखू शकले नाहीत. याव्यतिरीक्त मिराज शेख, रवी दलाल, आनंद पाटील यांना सामन्यात फारशी चमक दाखवता आली नाही. बचावफळीत सतपाल आणि स्वप्नील शिंदे यांनी प्रत्येकी ४-४ गुण मिळवले. मात्र त्यांच्या कामगिरीतही फारसं सातत्य दिसलं नाही. ज्याचा फायदा तेलगू टायटन्सच्या संघाला झाला.