18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

Pro Kabaddi Season 5 – गुजरातच्या जाळ्यात मुंबईची ससेहोलपट

गुजरातच्या वादळात मुंबईची धुळधाण

लोकसत्ता टीम | Updated: August 11, 2017 10:25 PM

यू मुम्बाकडून निराशाजनक खेळ

प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात आपल्या घरच्या मैदानावरचा पहिला सामना खेळताना गुजरात फॉर्च्युनजाएंट्सने यू मुम्बाचा पराभव केला आहे. चढाई आणि बचावात अष्टपैलू कामगिरी करत गुजरातने मुंबईवर ३९-२१ अशी मोठ्या फरकाने मात केली.

गुजरातच्या संघाने अष्टपैलू खेळ करत सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवली होती. मात्र मुम्बाच्या सर्व खेळाडूंनी आज निराशाजनक खेळ केला. संपूर्ण सामन्यात मुम्बाचा संघ फॉर्मात दिसत नव्हता. त्यामुळे गुजरातसारख्या नवख्या संघासमोर मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला.

यू मुम्बाचे चढाईपटू अपयशी –

यू मुम्बाच्या प्रत्येक खेळाडूचा अभ्यास करत मैदानात उतरलेल्या गुजरातच्या संघाने मुंबईच्या चढाईपटूंना आपल्या जाळ्यात फसवलं. कर्णधार अनुप कुमार ४ पॉईंट, काशिलींग अडके ४ पॉईंट आणि नितीन मदने ३ पॉईंट यांनी सामन्यात थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र त्यांनाही गुजरातच्या बचावापुढे आपले गुडघे टेकावे लागले.

सुरुवातीच्या सत्रात नितीन मदने, अनुप कुमारसारख्या खेळाडूंना केवळ बोनस पॉईंट घेता आले होते. शब्बीर बापूचं सतत अपयशी होणं मुम्बासाठी चिंतेचा विषय ठरतंय. वॉकलाईन पार केल्यानंतर शब्बीरची हालचाल प्रतिस्पर्धी संघाचा बचावपटू सहज ओळखतो. त्यामुळे शब्बीरला आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाचे बचावपटू हे बोनस पॉईंटचा सापळा रचतात, आणि त्याचवेळी कव्हरमध्ये खेळणारा बचावपटू शब्बीरची शिकार करतो.

गेले काही सामने शब्बीर बापूला पॉईंट मिळवण्यात मोठं दिव्य करावं लागत असल्याने, आगामी सामन्यात त्याला संघात किती जागा द्यायची हा देखील मोठा चिंतेचा विषय आहे. नितीन मदनेला आज संघात जागा मिळाली असली तरी त्याचा खेळही आश्वासक नव्हता. त्यामुळे कर्णधार अनुप कुमारवर सामन्यात दबाव आला. त्यातचं गुजरातच्या बचावपटूंनी दुसऱ्या सत्रात जवळपास १४ मिनीटापेक्षा जास्त काळ अनुपला संघाबाहेर बसवलं, ज्यामुळे यू मुम्बा सामन्यात डोकंच वर काढू शकली नाही.

बचावपटूंची पुन्हा एकदा हाराकिरी –

यू मुम्बाचा बचाव हा यंदाच्या पर्वातला त्यांच्यासाठी मोठा कळीचा मुद्दा बनलेला आहे. संघात नावाजलेले खेळाडू असूनही एकाही खेळाडूच्या कामगिरीत सातत्य दिसत नाही. आजच्या सामन्यात यू मु्म्बाची बचावफळी सपशेल अपयशी ठरली. डी. सुरेश कुमार, सुरिंदर सिंह यांना आजच्या सामन्यात एकही पॉईंट मिळवता आला नाही. कुलदीप सिंह आणि एन.रणजितने सामन्यात बचावात ५ पॉईंट मिळवले मात्र गुजरातच्या चढाईपटूंवर अंकुश ठेवण्यात ते देखील अपयशीच ठरले.

गुजरातच्या संघाचे चढाईपटू रेड करत असताना मुम्बाचे बचावपटू हे त्यांच्या आक्रमण रेषेत येऊन उभे राहत होते. त्यामुळे वेळेत स्वतःला मागे ढकलण्यात अपयश आल्याने मोठमोठ्या बचावपटूंना गुजरातच्या चढाईपटूंनी अगदी लिलया शिकार केलं. सुरिंदर सिंह हा यू मुम्बाचा एकमेव आश्वासक बचावपटू आहे, मात्र आजच्या सामन्यात त्याने केलेला उतावळेपणा त्याला आणि पर्यायाने संघाला चांगलाच नडला. त्यामुळे आगामी काळात आपल्या बचावफळीवर काम न केल्यास मुम्बाला स्पर्धेत याचा फटका बसू शकतो.

गुजरात एक्स्प्रेस सुस्साट –

गुजरातच्या संघाने आजच्या सामन्यात केलेला खेळ हा खरचं कौतुक करण्यासारखा होता. रोहीत गुलिया, सचिन आणि कर्णधार सुकेश हेगडे यांनी आक्रमक खेळाचं प्रदर्शन करत यू मुम्बाच्या बचावफळीला खिंडार पाडलं. नवोदीत रोहीत गुलियाने आजच्या सामन्यात ९, सचिनने ८ तर कर्णधार सुकेश हेगडेने चढाईत ४ पॉईंटची कमाई केली. विशेषकरुन सचिन आणि रोहीतने केलेल्या खेळासमोर अनुप कुमारसारखा दिग्गज खेळाडूही काहीकाळ भांबावलेला दिसत होता. अनुप कुमारला केलेला ‘टो टच’ हे आजच्या सामन्यातले गुजरातच्या संघासाठी सर्वात महत्वाचे प्लस पॉईंट ठरले आहेत.

ईराणी तडक्यासमोर यू मुम्बा हतबल –

गुजरातच्या बचावफळीचे आजच्या सामन्यातले हिरो ठरले ते ईराणचे फैजल अत्राचली आणि अबुझर मोहरममेघानी. उजव्या आणि डाव्या कोपऱ्यावर खेळणाऱ्या या दोन्ही इराणी खेळाडूंनी आजच्या सामन्यात मुम्बाच्या चढाईपटूंची अक्षरशः हवाच काढून टाकली. अनुप कुमार, नितीन मदने, काशिलींग अडके सारख्या खेळाडूंना डॅश, थाय होल्डस अँकल होल्ड करत या दोन्ही खेळाडूंनी मैदानाच्या बाहेर बसवलं.

विशेषकरुन अबुझरच्या बचावापुढे पॉईंट मिळवणं हे मुम्बाच्या चढाईपटूंना अशक्यप्राय होऊन बसलं होतं. अबुझरने आजच्या सामन्यात बचावात ५ गुणांची कमाई केली. त्याला फैजलने २ गुण तर प्रवेश भैंसवालने ३ गुण मिळत चांगली साथ दिली.

संपूर्ण सामन्यात यू मुम्बाचे खेळाडू एकदाही सामन्यात पुनरागमन करण्याच्या परिस्थितीत दिसले नाही. त्यात मुम्बाच्या खेळाडूंनी केलेला खेळ हा निराशाजनक होता. त्यामुळे आगामी काळात मुम्बाला उपांत्य फेरी गाठायची असल्यास, यापेक्षाही खडतर आव्हानांचा सामना करावा लागणार असं दिसतंय.

First Published on August 11, 2017 10:25 pm

Web Title: pro kabaddi season 5 u mumba vs gujrat fortunegiants match review