पवन शेरावतच्या आक्रमक चढायांच्या जोरावर बंगळुरु बुल्सने तामिळ थलायवाजवर मात केली आहे. ३२-२१ च्या फरकाने सामन्यात बाजी मारत बंगळुरुने तामिळ थलायवाजला गुणतालिकेत बॅकफूटवर ढकललं आहे. तामिळ थलायवाजकडून अजय ठाकूरचा अपवाद वगळता एकही खेळाडू आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करु शकला नाही.

पवन शेरावत आणि बंटी या जोडीने तामिळ थलायवाजच्या बचावफळीला खिंडार पाडलं. मनजीत-मोहीत चिल्लर अनुभवी बचावपटूंनाही बंगळुरुने जास्तीत जास्त वेळ मैदानाबाहेर ठेवलं. रण सिंहने डाव्या कोपऱ्यात पकडीमध्ये ४ बळी मिळवत तामिळ थलायवाजकडून चांगली झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र पवनच्या झंजावातापुढे त्याचा टिकाव लागला नाही. तामिळ थलायवाजकडून अजय ठाकूर आणि शब्बीर बापूने चढाईमध्ये ७ गुणांची कमाई केली.

बंगळुरु बुल्सकडून बचावफळीत सौरभ नंदालने आज आपली चांगली छाप पाडली. सौरभने तामिळ थलायवाजच्या ५ चढाईपटूंना आपल्या जाळ्यात फसवलं. या विजयानंतर बंगळुरु बुल्सचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आला आहे, तर तामिळ थलायवाजचा संघ सातव्या स्थानावर फेकला गेला आहे.