प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात अखेरीस दबंग दिल्लीच्या विजयरथाला गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाने खिळ घातली आहे. मुंबईत झालेल्या सामन्यात गुजरातने दिल्लीवर ३१-२६ च्या फरकाने बाजी मारली. रंगतदार झालेल्या सामन्यात दिल्लीने आपल्या पराभवाचं अंतर ७ गुणांपेक्षा कमी ठेवल्यामुळे त्यांना एक गुण देण्यात आला आहे. या एका गुणामुळे दिल्ली आपलं पहिलं स्थान कायम राखून आहे.

पहिल्या सत्रात गुजरातच्या खेळाडूंनी सामन्याची सुत्र आपल्या हाती ठेवली होती. गुरुनाथ मोरे, रोहित गुलिया आणि सचिन यांनी चढाईमध्ये महत्वाच्या गुणांची कमाई करत संघाला आघाडी मिळवून दिली. रविंद्र पेहल आणि जोगिंदर नरवाल या दिल्लीच्या जोडगोळीला गुजरातच्या त्रिकुटाने पहिल्या काही मिनीटांमध्ये चांगलच सतावलं. मात्र मोक्याच्या क्षणी दिल्लीच्या संघाकडून नवीन कुमार आणि चंद्रन रणजीत यांनी डाव पलटवला.

गुजरातच्या फॉर्मात नसलेल्या बचावफळीचा फायदा घेत दिल्लीच्या दोन्ही खेळाडूंनी झटपट गुण मिळवण्यास सुरुवात केली. दिल्लीच्या या आक्रमणासमोर गुजराचा संघ काहीसा बॅटफूटवर गेला. नवीन कुमारने पहिल्या सत्रात चढाईमध्ये ५ गुणांची कमाई करत दिल्लीला आघाडी मिळवून दिली. त्याला चंद्रन रणजीतने ३ गुण मिळवत चांगली साथ दिली. गुजरातची बचावफळी पहिल्या सत्रात आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करु शकली नाही. या जोरावर दबंग दिल्लीने १४-१२ अशी २ गुणांची निसटती आघाडी घेतली.

दुसऱ्या सत्रात गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाचे चांगलं पुनरागमन केलं. दिल्लीच्या बचावफळीने केलेल्या चुकांचा फायदा घेत गुजरातच्या चढाईपटूंनी सामन्यात १६-१६ अशी बरोबरी साधली. दुसऱ्या सत्रात गुजरातने दिल्लीच्या बचावफळीला लक्ष्य केलं होतं, ज्यात ते काही प्रमाणात यशस्वीही झाले. सामना संपायला ५ मिनीटं शिल्लक असताना गुजरातच्या संघाकडे २६-२२ अशी आघाडी होती. यानंतर गुजरातने सामन्यावरची आपली पकड ढिली होऊ दिली नाही. अखेरीस ३१-२६ च्या फरकाने गुजरातने सामन्यात बाजी मारली.