News Flash

बंगळुरू आणि पुणे समोरासमोर

बंगळुरूला आतापर्यंतच्या सात सामन्यांमध्ये पाच सामने गमवावे लागले असून फक्त दोनच सामने जिंकता आले आहेत.

| May 7, 2016 04:16 am

भारताचा मर्यादित षटकांचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि कसोटी कर्णधार विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले नेतृत्व केले असले तरी यंदाच्या आयपीएलमध्ये मात्र दोघांच्याही संघांकडून अपेक्षित कामगिरी पाहायला मिळालेली नाही. सध्याच्या घडीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ सातव्या स्थानावर असून रायझिंग पुणे सुपरजायंट्स सहाव्या स्थानावर आहेत. त्यामुळे या दोन्ही संघांना स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी जवळपास सारेच सामने जिंकावे लागणार आहे. शनिवारी हे दोन्ही संघ समोरासमोर उभे ठाकतील आणि त्यांच्यामध्ये रंगेल ती स्पर्धेतील अस्तित्वाची लढाई.

बंगळुरूला आतापर्यंतच्या सात सामन्यांमध्ये पाच सामने गमवावे लागले असून फक्त दोनच सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे या पुढील सामन्यांत कामगिरीमध्ये सुधारणा न झाल्यास त्यांच्यावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची पाळी येऊ शकते. बंगळुरूच्या संघाकडून जवळपास प्रत्येक सामन्यामध्ये दमदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. त्यांनी प्रत्येक सामन्यात सरासरी १८० धावा केल्या असल्या तरी त्यांना आतापर्यंत फक्त दोनच सामने जिंकता आले आहेत. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये कोहली (४३३) आणि ए बी डी’ व्हिलियर्स (३२०) अव्वल दहा जणांमध्ये आहेत. बंगळुरूची फलंदाजी चांगली होत असली तरी गोलंदाजी हा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे.

पुण्याच्या संघाने आतापर्यंत प्रथम फलंदाजी करत काही सामने गमावल्यानंतर गेल्या सामन्यात त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि त्यांनी विजयाची चव चाखली. त्यामुळे यापुढेही नाणेफेक जिंकल्यास धोनी क्षेत्ररक्षण स्वीकारण्याला प्राधान्य देईल. गेल्या सामन्यात पुण्याने उस्मान ख्वाजाला संधी दिली होती आणि त्याने ३० धावाही केल्या होत्या. गेल्या सामन्यात अजिंक्य रहाणेने अर्धशतक झळकावले असले तरी स्थिरस्थावर झाल्यावर त्याला मोठे फटके खेळणे जवळपास अशक्य दिसत होते. त्यामुळे त्याने या गोष्टीचा विचार करायला हवा. कर्णधार महेंद्रसिंग धोनीलाही लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आलेली नाही. पुण्याच्या गोलंदाजीमध्ये सातत्य पाहायला मिळालेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2016 4:13 am

Web Title: pune supergiants vs royal challengers bangalore
Next Stories
1 दिल्लीला पंजाबविरुद्ध विजयाची आशा
2 पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकपदी मिकी आर्थर
3 रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबची १५ टक्के उपस्थितीच्या निर्णयावर नाराजी
Just Now!
X