किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध आज सामना
मुंबई इंडियन्स आणि गुजरात लायन्स या दोन्ही संघांना सलग पराभूत केल्यानंतर विजयी हॅट्ट्रिक नोंदवण्यासाठी सनरायझर्स हैदराबादचा संघ सज्ज झाला आहे. पंजाबला आतापर्यंत चार सामन्यांमध्ये फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे या सामन्यात ते हैदराबादला पराभूत करू शकतील का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.
हैदराबादने मुंबईवर सात विकेट्सने विजय मिळवला होता, तर गुजरातला १० विकेट्सने पराभूत केले होते. गुजरातने सलग तीन सामने जिंकले होते, त्यामुळे त्यांना पराभूत केल्यामुळे हैदराबादचे मनोबल कमालीचे उंचावलेले असेल. त्याचबरोबर हा विजय त्यांनी महत्त्वाच्या खेळाडूंशिवाय मिळवला, हेदेखील लक्षणीय आहे. कारण युवराज सिंग, आशीष नेहरा आणि केन विल्यमसन हे तिन्ही खेळाडू जायबंदी आहेत.
हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर हा चांगल्या फॉर्मात आहे. या दोन विजयांमध्ये त्याने मोलाचा वाटा उचला होता. मुंबईविरुद्ध त्याने ७४ आणि गुजरातविरुद्ध त्याने नाबाद ९० धावांची दमदार खेळी साकारली होती. गेल्या सामन्यातील विजय त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा ठरला, कारण धावांचा दुष्काळ अनुभवणाऱ्या सलामीवीर शिखर धवनने या सामन्यात नाबाद ५३ धावांची खेळी साकारली होती. गोलंदाजीमध्ये भुवनेश्वर कुमारने गेल्या सामन्यात चार विकेट्स मिळवत सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. गुजरातच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या आरोन फिंचला त्याने स्वस्तात माघारी धाडले होते. त्याचबरोबर मुस्तफिझूर रेहमान, बरिंदर सरण, दीपक हुडा आणि बिपुल शर्मा हे चांगली गोलंदाजी करत आहेत.
आतापर्यंत पंजाबच्या खात्यामध्ये फक्त दोन गुणच जमा आहेत. त्यांना आतापर्यंत फक्त रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघावरच विजय मिळवता आला आहे. पंजाबचा संघ फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर अपयशी ठरताना दिसत आहे. कर्णधार डेव्हिड मिलर, ग्लेन मॅक्सवेल, मुरली विजय यांना अजूनही सातत्यपूर्ण फलंदाजी करता आलेली नाही. गोलंदाजीमध्येही अक्षर पटेल, मोहित शर्मा यांना सूर गवसलेला दिसत नाही.
दोन्ही संघांचा विचार करता सध्याच्या घडीला पंजाबपेक्षा हैदराबादचे पारडेच जड आहे. त्याचबरोबर हा सामना त्यांच्या घरच्या मैदानात होणार असल्याने त्यांना जिंकण्याची अधिक संधी असेल. दुसरीकडे पंजाबचा संघ विजयासाठी आसुसलेला आहे. या सामन्यात हैदराबादला पराभूत करून त्यांना विजयाच्या मार्गावर परतण्याची संधी आहे.
 

वेळ : रात्री ८.०० वाजल्यापासून.
प्रक्षेपण : सोनी सिक्स/एचडी आणि सेट मॅक्स/एचडी