ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या भारताच्या पी. व्ही. सिंधूने चायना खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. रोमहर्षक झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत सिंधूने कोरियाच्या जी ह्य़ून हिच्यावर विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. सिंधूला रविवारी अंतिम फेरीत चीनच्या सून यू हिचा सामना करावा लागणार आहे.

तब्बल एक तास आणि २४ मिनिटे चाललेल्या लढतीमध्ये चांगली चुरस पाहायला मिळाली, पण सिंधूने या सामन्यात ह्य़ूनवर ११-२१, २३-२१, २१-१९ असा निसटता विजय मिळवला. ह्य़ूनने पहिला गेम २१-११ असा जिंकत सामन्यावर पकड मजबूत केली होती. पहिल्या गेममध्ये सिंधू ५-१ अशी आघाडीवर होती. पण त्यानंतर ह्य़ूनने कंबर कसत दमदार खेळ करत फक्त पिछाडी भरून काढली नाही तर तिने आघाडी मिळवत पहिला गेमही जिंकला. दुसऱ्या गेममध्ये झोकात पुनरागमन करत सिंधूने २०-१७ अशी आघाडी घेतली होती. पण त्यानंतर सिंधू आणि ह्य़ून या दोघींचेही २१-२१ असे समान गुण झाले होते. पण त्यानंतर सिंधूने सर्वस्व पणाला लावत सलग दोन गुण मिळवत दुसरा गेम २३-२१ असा जिंकत सामन्यामध्ये १-१ अशी बरोबरी केली.

तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये सिंधू ३-७ अशी पिछाडीवर होती. पण त्यानंतर ही पिछाडी भरून काढत त्यानंतर सिंधूने १०-९ अशी नाममात्र आघाडीही घेतली. त्यानंतर सिंधू आणि ह्य़ून यांच्याकडून अप्रतिम खेळ केला, पण सिंधूने ह्य़ूनपेक्षा थोडा चांगला खेळ करत २०-१८ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर क्रॉस कोर्टचा दमदार फटका लगावत सिंधूने तिसऱ्या गेमसह उपांत्य फेरीही जिंकली.