अजिंक्यपदाच्या दिशेने आगेकूच करणाऱ्या रॅफेल नदाल व ग्रिगोर दिमित्रोव यांनी आकर्षक विजय मिळवत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष विभागात आगेकूच केली आहे. मात्र जो विल्फ्रेड त्सोंगा व इव्हो कालरेव्हिच यांना संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभवाला सामोरे जावे लागले.

नदालने कडक उन्हाच्या त्रासाचा लवलेश न दाखवत दामिर डिझुम्हुरचा ६-१, ६-३, ६-१ असा दणदणीत पराभव केला. जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित नदालने हा सामना एक तास ५० मिनिटांमध्ये जिंकला. त्याच्यापुढे अर्जेटिनाच्या दिएगो श्वात्र्झमनचे आव्हान असणार आहे. दिमित्रोवने रशियन खेळाडू आंद्रे रुब्लोव वर ६-३, ४-६, ६-४, ६-४ असा विजय मिळवला. त्याला पुढच्या फेरीत स्थानिक खेळाडू निक किर्गिओसचे आव्हान असणार आहे. किर्गिओसने त्सोंगाची घोडदौड रोखली. चुरशीने झालेला हा सामना त्याने ७-६ (७-५), ४-६, ७-६ (८-६), ७-६ (७-५) असा जिंकला. इटलीच्या अ‍ॅलन सेप्पीने तीन तास ५१ मिनिटे चाललेल्या लढतीनंतर कालरेव्हिचला पराभूत केले. ही लढत त्याने ६-३, ७-६ (७-४), ६-७ (३-७), ६-७ (५-७), ९-७ अशी जिंकली.

विजेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या मरिन चिलीचनेही विजयी वाटचाल राखली. त्याने रियान हॅरिसनला ७-६ (७-४), ६-३, ७-६ (७-४) असे पराभूत केले. स्पॅनिश खेळाडू पाब्लो कॅरेनो बुस्टाने लक्झेम्बर्गच्या गिलेस म्युलरला ७-६ (७-४), ४-६, ७-५, ७-५ असे हरवले. इंग्लंडच्या काईल एडमंडलाही निकोलस बाव्हिश्वेलीवर मात करताना संघर्ष करावा लागला. हा सामना त्याने ७-६ (७-४), ३-६, ४-६, ६-०, ७-५ असा जिंकला व चौथ्या फेरीत स्थान मिळवले.

येलेना ओस्तापेन्कोला पराभवाचा धक्का

विजेतेपदाचे स्वप्न साकारण्यासाठी इच्छुक असलेल्या कॅरोलिन स्वितोलिनाने १५ वर्षीय मार्ता कोस्टुकची अनपेक्षित विजयांची मालिका खंडित केली. मात्र फ्रेंच विजेत्या येलेना ओस्तापेन्कोला ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धेत पराभवाची चव चाखायला मिळाली.

स्वितोलिनाने कोस्टुकचा ६-२, ६-२ असा धुव्वा उडवला. तिने दोन्ही सेट्समध्ये पासिंग शॉट्सचा बहारदार खेळ केला. कोस्टुकने तिसऱ्या फेरीत प्रवेश करताना ऐतिहासिक कामगिरी केली होती. स्पर्धेत तिसरी फेरी गाठणारी ती सर्वात लहान खेळाडू होती. तिला अनुभवी खेळाडू स्वितोलिनापुढे फारसे कौशल्य दाखवता आले नाही. स्वितोलिनाची पुढील फेरीत डेनिसा अ‍ॅलतरेवाशी गाठ पडणार आहे. खोलवर सव्‍‌र्हिससाठी ओळखल्या जाणाऱ्या अ‍ॅलतरेवाने मॅगडा लिनेटीवर ६-१, ६-४ अशी मात केली.

गतवर्षी फ्रेंच स्पर्धा जिंकणाऱ्या ओस्तापेन्कोला इस्तोनियाच्या अ‍ॅनेट कोन्तावेटने ६-३, १-६, ६-३ असे हरवले. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळवणाऱ्या थायलंडच्या लुक्सिका कुमखुमला पेत्रा मार्टिकविरुद्ध ३-६, ६-३, ५-७ असा पराभव स्वीकारावा लागला. स्लोवाकियाची मॅगडेलिना रिबारीकोवा व युक्रेनची कॅथरिना बोन्दारेन्को यांच्यातील लढतही चुरशीने खेळली गेली. हा सामना रिबारीकोवाने ७-५, ३-६, ६-१ असा जिंकला.

स्पॅनिश खेळाडू कार्ला सोरेझ नॅव्हेरोने इस्तोनियाच्या केईया कानेपीचा ३-६, ६-१, ६-३ असा पराभव केला. पहिला सेट गमावल्यानंतर नॅव्हेरोने परतीचे फटके व सव्‍‌र्हिसवर सुरेख नियंत्रण ठेवत विजयश्री खेचून आणली.

दिविज-बोपण्णा तिसऱ्या फेरीत

भारताच्या दिविज शरण व रोहन बोपण्णा यांनी आपापल्या सहकाऱ्यांच्या समवेत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुषांच्या दुहेरीत तिसऱ्या फेरीकडे वाटचाल केली.

दिविजने अमेरिकेच्या राजीव रामच्या साथीने फॅबिओ फोगिनी व मार्सेल ग्रॅनोलस यांच्यावर ४-६, ७-६ (७-४), ६-२ अशी मात केली. दोन तास आठ मिनिटे झालेल्या या सामन्यात डावखुऱ्या दिविजने नेटजवळून प्लेसिंगचा कल्पक खेळ केला, तर रामने बिनतोड सव्‍‌र्हिस व परतीचे फटके असा खेळ केला. त्याने गतवर्षी पुरव राजाच्या साथीने फ्रेंच स्पर्धेत तिसरी फेरी गाठली होती.

रोहनने एडवर्ड रॉजर व्हॅसेलिनच्या साथीने जोओ सौसा व लिओनार्ड मेयर यांचे आव्हान ६-२, ७-६ (७-३) असे संपुष्टात आणले.

खेळाडूंशी चर्चा करूनच नियमांची अंमलबजावणी

कडक उन्हाबाबत स्पर्धेचे संचालक क्रेग टुली म्हणाले, ‘‘मेलबर्न येथील वातावरणाची पूर्ण कल्पना सर्व खेळाडूंना वेळोवेळी दिली जात असते. येथे जी काही नियमावली केली आहे ती खेळाडूंशी चर्चा करूनच झाली आहे. खेळाडूंसाठी बर्फ, भरपूर गार पाणी, विश्रांती कक्ष, मैदानावर आच्छादित खुर्च्या आदी सर्व सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. ही स्पर्धा खुल्या मैदानात घेण्याचीच प्रथा आहे.’’

तिसऱ्या फेरीत मिळविलेल्या एकतर्फी विजयामुळे मला खूप समाधान वाटत आहे. येथील स्थिती माझ्यासाठी अनुकूल असल्याचाच हा प्रत्यय आहे. मला शारीरिक तंदुरुस्तीच्या कोणत्याही तक्रारी जाणवत नाहीत. मी पूर्णपणे खेळावरच लक्ष केंद्रित केले आहे. आजूबाजूला काय घडत आहे याचा मी विचार करीत नाही.

-राफेल नदाल