सर्फराजच्या अर्धशतकाने मुंबईला सावरले

अनुभवी अजिंक्य रहाणेने (१) दुसऱ्या डावातही निराशा केल्यानंतर सर्फराज खानने (नाबाद ५३) साकारलेल्या झुंजार अर्धशतकाच्या बळावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील कर्नाटकविरुद्धच्या ‘ब’ गटातील सामन्यात दुसऱ्या डावात ८५ धावांची आघाडी मिळवली आहे.

दुसऱ्या दिवसअखेर मुंबईने ५ बाद १०९ धावा केल्या असून सर्फराज ५३ धावांवर खेळत आहे. त्यामुळे सामन्यात चुरस निर्माण झाली आहे. मात्र दुखापतग्रस्त पृथ्वी शॉबरोबरच रहाणे (१) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (१०) हे महत्त्वाचे फलंदाज गमावल्यामुळे मुंबई कर्नाटकला विजयासाठी किती धावांचे आव्हान देणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

त्यापूर्वी, शुक्रवारच्या ३ बाद ७९ धावांवरून दिवसाला सुरुवात करताना शशांक अतार्डेच्या (५/५८) प्रभावी फिरकीमुळे मुंबईने कर्नाटकला २१८ धावांत गुंडाळले. सलामीवीर रवीकुमार समर्थने सर्वाधिक ८६ धावा केल्यामुळे कर्नाटकला पहिल्या डावात २४ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेण्यात यश आले.

संक्षिप्त धावफलक

* मुंबई (पहिला डाव) : १९४

* कर्नाटक (पहिला डाव) : ६८.५ षटकांत सर्व बाद २१८ (रवीकुमार समर्थ ८६, बी. आर. शरथ ४६; शशांक अतार्डे ५/५८)

* मुंबई (दुसरा डाव) : ३६ षटकांत ५ बाद १०९ (सर्फराज खान खेळत आहे ५३, शाम्स मुलानी ३१; अभिमन्यू मिथुन ३/५२)

दुखापतीमुळे पृथ्वीची माघार

खांद्याच्या दुखापीमुळे पृथ्वी शॉ कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात दुसऱ्या डावात फलंदाजीला येऊ शकणार नाही. उपचारासाठी पृथ्वी बेंगळूरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला रवाना झाला असून न्यूझीलंड दौऱ्यासाठीही त्याच्या समावेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शुक्रवारी क्षेत्ररक्षण करताना पृथ्वीला दुखापत झाली.

महाराष्ट्रावर दारुण पराभवाचे सावट

नवी दिल्ली : पहिल्या डावात अवघ्या ४४ धावांत खुर्दा झाल्यानंतर महाराष्ट्राच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावातही हाराकिरी पत्करली. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या सेनादलविरुद्धच्या ‘क’ गटातील सामन्यात महाराष्ट्राची दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसअखेर ५ बाद ९३ धावा अशी केविलवाणी अवस्था झाली असून ते अद्यापही १४८ धावांनी पिछाडीवर आहेत.

संक्षिप्त धावफलक

*  महाराष्ट्र (पहिला डाव) : ४४

*  सेनादल (पहिला डाव) : ९५.२ षटकांत सर्व बाद २८५ (रवी चौहान ६५, अर्जुन शर्मा ४७; मनोज इंगळे ५/७३)

* महाराष्ट्र (दुसरा डाव) : ३४ षटकांत ५ बाद ९३ (नौशाद शेख खेळत आहे ४०, विशांत मोरे खेळत आहे ३३; सच्चिदानंद पांडे ३/२०)