भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि ‘द वॉल’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडचा मुलगा समित क्रिकेटच्या मैदानात चमकला आहे. बंगळुरुत सुरु असलेल्या १४ वर्षाखालील मुलांच्या कॉटोनियन शिल्ड स्पर्धेत समितने आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.
समितने फलंदाजी करताना नाबाद ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर गोलंदाजीत अवघ्या ९ धावा देत ३ बळीही घेतले. समितच्या या अष्टपैलू खेळाच्या जोरावर मल्ल्या आदिती इंटरनॅशनल शाळेने केंब्रिज पब्लिक स्कूलचा ९ गडी राखून पराभव केला. याआधीही शालेय क्रिकेटमध्ये समितने आपल्या चमकदार कामगिरीमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
सध्या सचिन तेंडुलकराच मुलगा अर्जुनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. भारताच्या १९ वर्षाखालील संघाकडून श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी अर्जुनची भारतीय संघात निवड झाली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात अर्जुनने एक बळीही घेतला होता. त्यामुळे शालेय पातळीवर समितने चांगली कामगिरी करत राहण्याचा धडाका सुरु ठेवला, तर आगामी काळात त्याचीही भारतीय संघात वर्णी लागण्याची शक्यता आहे.