राजस्थानच्या जयपूरमध्ये एका गोलंदाजाने क्रिकेटच्या मैदानात नवा विक्रम प्रस्थापित केलाय. जयपूरमधील एका टी-२० सामन्यात आकाश चौधरी या गोलंदाजाने आपल्या चार षटकात प्रतिस्पर्धी संघातील सर्व फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवण्याचा पराक्रम केला. स्थानिक सामन्यातील त्याच्या या अफलातून कामगिरीची सध्या क्रिकेट वर्तुळात चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. आकाशने भेदक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाला हतबल केले. आकाशने ४ षटकात एकही धाव न देता १० बळी मिळवले.

यापूर्वी क्रिकेटच्या मैदानात भारताचे माजी कसोटीपटू अनिल कुंबळे यांनी एका कसोटी सामन्यात एका डावात १० बळी मिळवण्याचा विक्रम केला होता. पण, स्थानिक क्रिकेटच्या मैदानातील केवळ ४ षटकांत १० बळी घेण्याची ही कामगिरी कौतुकास्पद आणि लक्षवेधी अशी आहे. जयपूरमधील स्वर्गीय भंवर सिंह चषक स्पर्धेत डावखुरा जलदगती गोलंदाज आकाशनं ही ऐतिहासिक कामगिरी केली. या सामन्यात पर्ल अकॅडमीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिशा क्रिकेट अकॅडमीनं २० षटकात १५६ धावा केल्या.

या धावांचा पाठलाग करताना मैदानात उतरलेल्या पर्ल अकॅडमीच्या फलंदाजांनी आकाशच्या गोलंदाजीसमोर नांगी टाकली. त्याच्या भेदक माऱ्याने पर्ल अकॅडमीचा संघ अवघ्या ३६ धावांत गारद झाला. आकाशने पहिल्या तीन षटकात प्रत्येकी दोन बळी घेतले. तर अखेरच्या षटकात हॅटट्रिकची किमया साधत टी-२० तील विश्वविक्रमाची नोंद केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.