नवी दिल्ली : न्यूपोर्ट (अमेरिका) येथे सुरू असलेल्या हॉल ऑफ फेम खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारण्यात भारताचा रामकुमार रामनाथन यशस्वी ठरला आहे. त्यामुळे एकेरीतील एटीपी विजेतेपदाचे स्वप्न त्याच्या अगदी दृष्टीपथात आले असून त्यापासून तो आता केवळ एक विजय दूर आहे.

रविवारी रामकुमारने अमेरिकेच्या टिम स्मिसझेकवर दोन सरळ सेटमध्ये मात करत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. २३ वर्षांचा उमदा युवा असलेल्या चेन्नईच्या रामकुमारने या सामन्यात टिमला ६-४, ७-५ असे अटीतटीच्या लढतीत पराभूत केले. त्यामुळे गेल्या सात वर्षांमध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा रामकुमार हा एकमेव भारतीय ठरला आहे. जर हा सामना तो जिंकू शकला तर १९९८ सालानंतर एटीपी विजेतेपद पटकावणारा तो दुसरा टेनिसपटू ठरेल. २० वर्षांपूर्वी लिएण्डर पेसने हे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर सोमदेव देवबर्मनने २०११ साली जोहान्सबर्गच्या एटीपी स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते. यंदाचा विम्बल्डन उपविजेता केव्हिन अँडरसन हा त्यावेळी विजेता ठरला होता. दरम्यान, रामकुमारचा अंतिम सामना स्टीव्ह जॉन्सन याच्याशी होणार आहे.