उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी गुजरातचे शर्थीचे प्रयत्न
गुजरातच्या पाच फलंदाजांना झटपट माघारी धाडत मुंबईचा संघ त्यांच्यावर तिसऱ्याच दिवशी फॉलोऑन लादण्याचे स्वप्न पाहात होता. पण भार्गव मेराईने रणजी स्पर्धेतील पहिले शतक झळकावत मुंबईला धडकी भरवली. मेराईच्या नाबाद दीडशतकाच्या जोरावर गुजरातने तिसऱ्या दिवसअखेर ७ बाद ३५५ अशी मजल मारली असून ते अजूनही १७६ धावांनी पिछाडीवर आहेत. उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यासाठी मेराईच्या खेळीच्या जोरावर गुजरातने शर्थीचे प्रयत्न केले असले तरी ते बाद फेरीत पोहोचणार का, याची उत्सुकता चौथ्या दिवशी असेल.
गुजरातने तिसऱ्या दिवशी कर्णधार पार्थिव पटेलसह (४) झटपट दोन फलंदाज गमावले आणि ३ बाद १०२ धावसंख्येवरून त्यांची ५ बाद १३९ अशी अवस्था झाली. वेगवान गोलंदाज बद्री आलमने हे दोन्ही बळी मिळवले. त्या वेळी मुंबईचा संघ झटपट बळी मिळवत गुजरातवर फॉलोऑन लादेल असे वाटत होते. पण मेराईने परिस्थितीनुरूप दमदार खेळ केला, त्याला अक्षर पटेलने सुयोग्य साथही दिली. या जोडीने सहाव्या विकेटसाठी १५५ धावांची भागीदारी रचत मुंबईला सामन्यावर पकड मिळवण्यापासून दूर लोटले. अक्षरने १० चौकारांच्या जोरावर ८८ धावांची खेळी साकारली. या जोडीने जवळपास चार तास मुंबईच्या गोलंदाजांना तंगवले. अक्षर बाद झाला असला तरी मेराईने मुंबईच्या गोलंदाजीचा समर्थपणे सामना केला. एकेकाळी बलस्थान असलेली मुंबईची फिरकी गोलंदाजी बोथट वाटली. या सामन्यात पुनरागमन करणारा डावखुरा फिरकीपटू इक्बाल अब्दुल्लाचे चेंडू वळत नव्हते आणि त्याचा मारा निष्प्रभ होता.
मेराईची ही खेळी त्याच्यासह गुजरातसाठी मोलाची ठरली. तब्बल ५०६ मिनिटे त्याने खेळपट्टीवर ठाण मांडत मुंबईची गोलंदाजी मोडीत काढली. मेराईने ३१५ चेंडूंत १३ चौकारांसह नाबाद १५० धावांची सुंदर खेळी साकारली. तिसऱ्या दिवशी गुजरातने ४ फलंदाज गमावत २५३ धावा केल्या. त्यामुळे सामन्याच्या अखेरच्या दिवशी फॉलोऑनची आपत्ती टाळून ते आघाडी मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठणार का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ५३१
गुजरात (पहिला डाव) : १२५ षटकांत ७ बाद ३५५ (भार्गव मेराई खेळत आहे १५०, अक्षर पटेल ८८; शार्दुल ठाकूर ४/७५)