पहिल्या दिवसअखेर मुंबईच्या ४ बाद ३५२ धावा

मुंबई : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या बाद फेरीतील आव्हान जवळपास संपुष्टात आल्यानंतर मुंबईने मध्य प्रदेशविरुद्ध मात्र दमदार कामगिरीचे प्रदर्शन केले. आकर्षित गोमेल आणि सर्फराज खान यांच्या दमदार शतकी खेळीमुळे ४१वेळा रणजी करंडक विजेत्या मुंबईने पहिल्या दिवसअखेर ४ बाद ३५२ धावसंख्या उभारली.

वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात मुंबईने संघात अनेक बदल केले. सलामीवीर जय बिश्त आणि भूपेन ललवानी यांच्या जागी मुंबईने हार्दिक तामोरे आणि आकर्षित गोमेल यांना संधी दिली. तामोरे मात्र या संधीचा फायदा उठवू शकला नाही. अवघ्या १२ धावांवर त्याला कुलदीप सेनने माघारी पाठवले. पण त्यानंतर गोमेल आणि सूर्यकुमार यादव यांनी मुंबईच्या डावाला उभारी दिली. या दोघांनी दुसऱ्या गडय़ासाठी ५२ धावांची भागीदारी रचली. पण सेनने अनुभवी सूर्यकुमारचा (४३) अडसर दूर करत मुंबईला दुसरा धक्का दिला. त्यानंतर लगेचच त्याने सिद्धेश लाडला (४) त्रिफळाचीत करत माघारी पाठवले.

मुंबईची ३ बाद ७२ अशी बिकट अवस्था झाली असताना आकर्षित आणि सर्फराज खान धावून आले. याआधीच्या सामन्यांत एक त्रिशतक आणि एक द्विशतक झळकावणाऱ्या सर्फराजने मध्य प्रदेशच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. या दोघांनी चौफेर फटकेबाजी करत मध्य प्रदेशच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. आक्रमक खेळी करणाऱ्या सर्फराजने यंदाच्या रणजी मोसमातील तिसऱ्या शतकाला गवसणी घातली. त्यानंतर आकर्षितनेही आपले शतक साजरे केले.

दिवसाचा खेळ संपण्यास काही षटके शिल्लक असताना ऑफस्पिनर शुभम शर्मा याने मध्य प्रदेशला चौथे यश मिळवून दिले. त्याने मैदानावरील स्थिरावलेली जोडी फोडत मध्य प्रदेशला सामन्यात पुनरागमन करून दिले. मात्र आकर्षित बाद होण्याआधी त्याने सर्फराजसह चौथ्या गडय़ासाठी २७५ धावांची भर घातली होती. आकर्षितने ११ चौकार आणि १ षटकारासह १२२ धावांची खेळी केली.

सर्फराजने २०४ चेंडूंत २२ चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी करत नाबाद १६९ धावा फटकावल्या आहेत. सर्फराजने द्विशतकाकडे कूच केली असून त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी शाम्स मुलानी आणि कर्णधार आदित्य तरे यांची साथ लाभू शकते. मध्य प्रदेशकडून कुलदीप सेन याने तीन बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक

मुंबई (पहिला डाव) : ८५ षटकांत ४ बाद ३५२ (सर्फराज खान खेळत आहे १६९, आकर्षित गोमेल १२२, सूर्यकुमार यादव ४३; कुलदीप सेन ३/६७) वि. मध्य प्रदेश.

विशांत, आशय यांनी महाराष्ट्राला सावरले

बारामती : अवघ्या १८ धावांत आघाडीच्या पाच फलंदाजांना गमावल्यानंतर यष्टीरक्षक विशांत मोरे (५९ धावा) आणि नवव्या स्थानावरील आशय पालकर (६०) या दोघांनी झळकावलेल्या झुंजार अर्धशतकांमुळे महाराष्ट्राने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उत्तराखंडविरुद्धच्या ‘क’ गटातील लढतीत पहिल्या डावात २०७ धावांपर्यंत मजल मारली.बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर सुरू असलेल्या या लढतीतील पहिल्या दिवसअखेर उत्तराखंडने ३ बाद ११२ धावा केल्या असून ते अद्यापही ९५ धावांनी पिछाडीवर आहेत. सलामीवीर कमल सिंग ५१, तर यष्टीरक्षक सौरभ रावत शून्यावर खेळत आहे.