रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील बडोद्याविरुद्धच्या सलामीच्या सामन्यासाठी मुंबईच्या १५ सदस्यीय संघात कसोटी विशेषज्ञ अजिंक्य रहाणे आणि सलामीवीर पृथ्वी शॉ यांचा समावेश करण्यात आला आहे.

४१ वेळा रणजी विजेत्या मुंबईचा २०१९-२०च्या रणजी हंगामातील पहिला सामना ९ डिसेंबरपासून बडोद्याविरुद्ध त्यांच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद आणि अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज आदित्य तरेकडे उपकर्णधार सोपवण्यात आले आहे. फलंदाज श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू शिवम दुबे यांची भारतीय संघात निवड झाल्यामुळे मुंबईच्या संघाचा ते भाग नाहीत. भारतीय संघ दोन महिन्यांनंतर न्यूझीलंडशी कसोटी मालिका खेळणार असल्याने रहाणे मुंबईसाठी उपलब्ध असेल.

उत्तेजक पदार्थाच्या सेवनप्रकरणी आठ महिन्यांची बंदी भोगल्यानंतर पृथ्वीने सय्यद मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अव्वल साखळीत दिमाखात पुनरागमन केले. या संघात जय बिस्ता, शुभम रांजणे, शाम्स मुलानी यांच्यासह वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर आणि धवल कुलकर्णी या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. सिद्धेश लाडचा शुक्रवारी विवाह होत असल्याने तो पहिल्या सामन्यासाठी अनुपलब्ध असणार आहे.

मुंबईचा संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), आदित्य तरे (उपकर्णधार), अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, जय बिस्ता, शुभम रांजणे, आकाश पारकर, सर्फराज खान, शाम्स मुलानी, विनायक भोईर, शषांक आटार्डे, शार्दूल ठाकूर, तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी आणि एकनाथ केरकर.