भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रवी शास्त्री यांनी आयसीसी क्रिकेट समितीमधून राजीनामा दिला आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड न झाल्याने रवी शास्त्री यांनी माध्यम प्रतिनिधी पदाचा राजीनामा देऊन  आपली नाराजी जाहीर केल्याचे बोलले जात आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झालेले अनिल कुंबळे हे ‘आयसीसी‘च्या समितीचेही अध्यक्ष आहेत.
दरम्यान, भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या निवडीमध्ये सुरूवातीपासून रवी शास्त्री यांचेच नाव आघाडीवर होते. पण ऐनवेळी अनिल कुंबळे यांचे नाव शर्यतीत आले आणि त्यांना एका वर्षासाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. निवड समितीतील सदस्य असलेल्या गांगुली यांच्याशी असलेल्या वादांमुळे प्रशिक्षक म्हणून निवड झाली नाही, असे वक्तव्य शास्त्री यांनी केले होते. त्यावर शास्त्री मुर्खांच्या जगात वावरत आहेत अशी टीका सौरव गांगुलीने केली होती.
रवी शास्त्री गेली सहा वर्षे आयसीसी क्रिकेट समितीचे माध्यम प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. या समितीवर आयसीसीचे शशांक मनोहर आणि माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड हे देखील सदस्य आहेत.