भारतीय कसोटी संघ सध्या हैदराबादमध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी सामना खेळत आहे. कोहली ब्रिगेडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला असला तरी या सामन्यात गोलंदाजीच्या बाबतीत फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद होणार आहे. अश्विनने बांगलादेशविरुद्ध दोन विकेट्स घेतल्यानंतर तो कसोटी विश्वास सर्वाधिक जलद गतीने २५० विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरणार आहे. अश्विन आजवर ४४ कसोटी सामने खेळला असून त्याच्या खात्यात २४८ विकेट्स जमा आहेत.

 

सर्वाधिक जलद गतीने कसोटी विश्वात २५० विकेट्स घेण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज डेनिस लिलीच्या नावावर आहे. डेनिस लिलीने ४८ कसोटी सामन्यात २३.३७ च्या सरासरीने २५१ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय, द.आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनच्या नावावर देखील २५० विकेट्स जमा आहेत. स्टेनने ही कामगिरी ४९ कसोटी सामन्यांमध्ये केली होती. आफ्रिकेचे माजी गोलंदाज एलन डॉनल्ड यांनीही ५० कसोटी सामन्यांमध्ये २५० विकेट्सचा आकडा पार केला होता. डॉनल्ड यांनी तब्बल २२.११ च्या सरासरीने विकेट्स घेतल्या होत्या, तर एकूण १६ वेळा त्यांनी एकाच सामन्यात पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.

पाकिस्तानचे माजी गोलंदाज वकार युनूस यांचाही जलद गतीने २५० विकेट्स घेणाऱया गोलंदाजांमध्ये समावेश होतो. वकार युनूस यांनी ५१ कसोटी सामन्यांत २५४ विकेट्स घेतल्या होत्या. लक्षवेधी बाब म्हणजे, वकार युनूस यांची सरासरी अफलातून सरासरी राहिली. युनूस यांनी २१.७२ च्या सरासरीने २५४ विकेट्स घेतल्या होत्या.