प्रतिभावान डावखुरा अष्टपैलू रवींद्र जडेजाची ‘विस्डेन’तर्फे २१व्या शतकातील सर्वाधिक मौल्यवान भारतीय कसोटीपटू म्हणून निवड करण्यात आली.

३१ वर्षीय जडेजाला ९७.३ गुण मिळाले. विश्वातील सर्वाधिक मौल्यवान कसोटीपटू म्हणून श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनची निवड करण्यात आली. तर जडेजाने आश्चर्यकारकरीत्या या यादीत दुसरा क्रमांक मिळवला. एका इंग्रजी संकेतस्थळाने पुरवलेल्या  आकडेवारीच्या आधारे ‘विस्डेन’ने मौल्यवान खेळाडूंची यादी काढली असून यामध्ये खेळाडूंच्या संघाच्या विजयी सामन्यातील कामगिरीला प्राधान्य देण्यात आले आहे.

‘‘भारतासाठी क्रिकेट खेळणे हे माझे स्वप्न होते. ‘विस्डेन’ने सर्वाधिक मौल्यवान खेळाडूसाठी माझी निवड केल्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. माझे कुटुंबीय, संघसहकारी, प्रशिक्षक आणि चाहत्यांच्या पाठिंब्याशिवाय मी इथवर मजल मारू शकलो नसतो,’’ असे जडेजा म्हणाला.

जडेजाने ४९ कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना १,८६९ धावा केल्या असून यामध्ये १ शतक आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याशिवाय जडेजाने २१३ बळीसुद्धा मिळवले आहेत.