आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी सलामीवीर देवदत्त पडिक्कल करोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे आता तो सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, देवदत्तला क्वारंटाइन ठेवण्यात आले आहे. यंदाच्या हंगामात आरसीबी आपला पहिला सामना 9 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे बलाढ्य मु्ंबईविरुद्धच्या सामन्यात देवदत्तची अनुपस्थिती संघासाठी घातक ठरेल.

 

गेल्या हंगामात देवदत्तने आयपीएल पदार्पण केले आणि सलामीवीर म्हणून त्याने एक जबरदस्त कामगिरी केली. बीसीसीआयच्या एसओपीनुसार, एखादा खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळल्यास, त्याला कमीतकमी 10 दिवस वेगळे राहावे लागेल. मागील वर्षी देवदत्तने आरसीबीसाठी भन्नाट कामगिरी केली होती. त्याने 15 सामन्यात 5 अर्धशतकांसह 473 धावा केल्या.

देवदत्तपूर्वी अक्षर पॉझिटिव्ह

देवदत्तपूर्वी, दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार फिरकीपटू अक्षर पटेल करोनाच्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे. दिल्ली कॅपिटल्सने एएनआयला अक्षरबाबत वृत्त दिले. 10 एप्रिलला दिल्लीचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी मुंबईत रंगणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये करोनाची लागण झालेला अक्षर हा दुसरा आणि देवदत्त तिसरा खेळाडू आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा खेळाडू नितीश राणाला करोनाने ग्रासले होते. मात्र, त्यानंतर तो निगेटिव्ह आढळला. करोनाची लागण झाल्यानंतर अक्षरला क्वारंटाइन करण्यात आले आहे, असे फ्रेंचायझीने सांगितले.