भारतीय संघाने कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर झालेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात बाजी मारली. टी २० मालिकेत २-१ असा विजय मिळवल्यानंतर कसोटी मालिकेतही भारताने २-० असे निर्विवाद वर्चस्व राखत ICC च्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले अव्वल स्थान कायम राखले. भारताने बांगलादेशवर १ डाव आणि ४६ धावांनी मात केली. पहिला डाव ३४७ धावांवर घोषित केल्यानंतर बांगलादेशचा दुसरा डाव भारताने १९५ धावांवर संपला. त्यामुळे भारताला दमदार विजय मिळाला.

भारताने या विजयासह मायदेशात सलग १२ कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला. भारताच्या या यशस्वी वाटचालीत भारतीय गोलंदाजांनी मोलाचे योगदान दिले आहे. पण ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टींग याची पसंती मात्र अद्यापही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनाच आहे. गेल्या काही वर्षात टीम इंडियाला प्रतिभावान वेगवान आणि फिरकीपटू गोलंदाज मिळाले आहेत. पण परदेशी खेळपट्टीवर फिरकीपटूंची काहीशी तारांबळ उडते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांच्या ताफ्यालाच माझी पसंती आहे, असे पॉन्टींगने म्हटले आहे.

“भारतीय गोलंदाजही दमदार आहेत. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे दोघे गेल्या दोन वर्षात अप्रतिम कामगिरी करत आहेत. त्यात आता उमेश यादव आणि अनुभवी इशांत शर्मा याची त्यात भर पडली आहे. त्यामुळे भारताचा वेगवान गोलंदाजांचा ताफा सुसज्ज आहे. या वेगवान ताफ्याला जेव्हा अश्विन आणि जाडेजा यांची साथ मिळते तेव्हा त्यांची गोलंदाजी अधिक बहरते. पण भारताचे फिरकीपटू ऑस्ट्रेलियात मात्र कच खातात”, असे तो क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या संकेतस्थळासाठी दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

“नॅथन लायनची ऑस्ट्रेलियातील कामगिरी पाहिली तर ती भारतीय गोलंदाजांच्या आकडेवारीपेक्षा खूप चांगली आहे. मिचेल स्टार्कचे गोलंदाजीतील वैविध्यदेखील वाखाणण्याजोगे आहे. मी त्याच्या गोलंदाजीचा चाहता आहे. त्यामुळे मी आठवड्याचे सातही दिवस म्हणजेच कायम ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचाच पसंती देईन”, असे पॉन्टींग म्हणाला.