आयपीएलच्या गतवर्षीच्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचं नेतृत्व करणाऱ्या रविचंद्रन आश्विनने, राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात जोस बटलरला मंकडिंग करत केलेलं रनआऊट चांगलंच गाजलं होतं. ६९ धावांवर खेळत असलेला जोस बटलर त्यावेळी नॉन स्ट्राईक एंडला उभा होता. चेंडू टाकण्याआधीच धाव घेण्यासाठी सज्ज झालेल्या बटलरने क्रिज सोडली होती. आश्विनने ही संधी साधत त्याला मंकडिंग करत बाद केलं. यावरुन नंतर बराच वादही झाला होता. आयपीएलच्या तेराव्या हंगामात आश्विन दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे. दिल्लीकडून खेळत असताना आश्विनला मंकडिंगची परवानगी देणार नसल्याचं मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटींगने स्पष्ट केलंय.

“मी त्याच्याशी याविषयी बोलणार आहे. आम्ही भेटल्यानंतर पहिलं काम हेच असेल. कदाचीत चर्चेदरम्यान आश्विन…मी केलेलं मंकडिंग हे नियमांत बसणार होतं असंच म्हणले आणि ते खरंही आहे. पण मंकडिंग करुन धावबाद करणं हे खेळभावनेला साजेसं नाही. मला ते पटत नाही आणि दिल्ली कॅपिटल्स संघात अशा गोष्टींचा वापर होऊ नये याची मला काळजी घ्यायची आहे.” The Grade Cricketer Podcast मध्ये रिकी पाँटींग बोलत होता.

अवश्य वाचा – IPL 2020 : बाबांसोबत जाण्यासाठी लहानग्या आर्याचा हट्ट, अजिंक्यच्या बॅगेत बसून तयार

ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी कर्णधारांपैकी एक मानल्या जाणाऱ्या रिकी पाँटींगने काही वर्षापूर्वी दिल्लीच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेतली आहे. गेल्या हंगामात आश्विनने मंकडिंग केल्यानंतर पाँटींगने आपल्या संघातील गोलंदाजांनाही याबद्दल समजल दिली होती. मला माहिती आहे आश्विनने तशी गोष्ट केल्यानंतर अनेक गोलंदाज मंकडिंग करुन धावबाद करण्याचा प्रयत्न करतील. पण दिल्लीकडून खेळताना आपण हा प्रकार करणार नाही आहोत असं पाँटींगने आपल्या खेळाडूंना स्पष्ट केलं होतं. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात यंदाचा आयपीएल हंगाम युएईत खेळवला जाणार आहे.

अवश्य वाचा – Dream 11 ची स्पॉन्सरशिप फक्त IPL 2020 पुरतीच – BCCI चा निर्णय