विस्फोटक फलंदाजी आणि चपळ यष्टीरक्षणामुळे गेल्या काही दिवसांमध्ये ऋषभ पंत यानं सर्वांची मनं जिंकली आहेत. खराब यष्टीरक्षणामुळे संघाबाहेर ठेवण्यात आलेल्या पंतला चांगल्या कामगिरीचं बक्षीस मिळण्याची शक्यता आहे. इंग्लंडविरोधात होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-२० सामन्यासाठी ऋषभ पंतला संघात स्थान मिळणार असल्याचं बीसीसीआयच्या सुत्रांनी सांगितलं आहे.

ऋषभ पंतला खराब कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय आणि वन-डे मालिकेत डावलण्यात आलं होतं. तर कसोटी दुसऱ्या क्रमांकाचा यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. आयपीएलमध्ये धावासाठी झगडणाऱ्या पंतसाठी हा मोठा झटका होता. पण पंत यानं निराश न होता मिळालेल्य संधीचं सोनं केलं.

ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पंतला संघात स्थान देण्यात आलं. तेव्हापासून पंत यानं माघारी पाहिलेच नाही. पंत यानं ऑस्ट्रेलियात भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा चोपण्याचा विक्रम केला. शिवाय यष्टीमागेही काही भन्नाट झेल घेतले. त्यानंतर आता मायदेशात सुरु असलेल्या इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यात ऋषभ पंत यानं तुफानी फटकेबाजी केली. शिवाय दुसऱ्या कसोटी सामन्यात उत्कृष्ट यष्टीरक्षण करत सर्वांना हैराणही केलं.

पंतनं आपल्यामधील कमकवूत बाजू सुधारल्याचं त्याच्या या कामगिरीवरुन दिसत आहे. त्यामुळे मायदेशात होणाऱ्या इंग्लंडविरोधातील एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत पंतला भारतीय संघात संधी मिळू शकते.