18 October 2019

News Flash

पंत, प्रसाद आणि पर्याय!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील ट्वेन्टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पंतला जेमतेम चार धावा करता आल्या.

(संग्रहित छायाचित्र)

प्रशांत केणी

ऋषभ पंत हा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटसाठी देशातील पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक असेल, असे राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद काही महिन्यांआधीपर्यंत निर्धास्तपणे म्हणायचे. महेंद्रसिंह धोनीची कारकीर्द अस्ताला जात असताना आपण भारतीय क्रिकेटच्या भविष्याचा प्रश्न सोडवला आहे, हा विश्वास त्यांना वाटत होता. परंतु आता त्यांच्या या विश्वासाला तडा गेला आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये पंतसाठी पर्यायी यष्टिरक्षक आमच्याकडे उपलब्ध आहे, अशा शब्दांत प्रसाद यांनी पंतला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील ट्वेन्टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पंतला जेमतेम चार धावा करता आल्या. त्याआधी वेस्ट इंडिज दौऱ्यासह अन्य मालिका असो किंवा स्पर्धा पंतच्या फलंदाजीतील अपयश आणि खराब यष्टिरक्षण यावर टीका होत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर भारताची संघबांधणी करताना पंतला पुरेशी संधी दिली जात आहे. परंतु धोनीचा वारसदार भारताला अद्याप सापडलेला नाही.

पंतची एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील सरासरी अनुक्रमे २२.९० आणि २०.४० इतकी चिंताजनक आहे. मोठय़ा खेळी त्याच्याकडून साकारल्या जात नाहीत. एकदिवसीय क्रिकेटच्या विश्वचषकात शिखर धवनने दुखापतीमुळे माघार घेतल्यानंतर पंतला संधी मिळाली. पण चौथ्या स्थानावर फलंदाजीला उतरणाऱ्या पंतला त्याचे सोने करता आले नाही. चार सामन्यांत फक्त ११६ धावा त्याला करता आल्या. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यात त्याच्यातील उणिवा प्रकर्षांने समोर आल्या. त्रिनिदादला पंत बाद झाल्यानंतर संतप्त प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की, ‘‘पंत ज्या पद्धतीने फटका खेळून बाद झाला, त्याची पुनरावृत्ती केल्यास त्याला सांगावे लागेल की, तुझ्यात गुणवत्ता असो किंवा नसो, तुला त्याचे परिणाम भोगण्यासाठी तयार राहायला हवे.’’ भारताचे फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांनीही पंतची कानउघाडणी केली आहे. निर्भयतेने खेळणे आणि निष्काळजीपणे खेळणे, यातील फरक युवा खेळाडूंनी समजून घ्यायला हवा. पंतला निर्भयतेने खेळायला हवे, निष्काळजीपणे नव्हे, असे राठोड यांनी ताशेरे ओढले आहेत. कसोटी क्रिकेटमधील ४४.३५ ही पंतची सरासरी आणि ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये झळकावलेली शतके जरी समाधानकारक असली, तरी त्याचे धावांचे सातत्य आणि यष्टीमागील कामगिरी प्रश्नांकित आहे. त्यामुळे तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधील पंतचे स्थान धोक्यात आहे.

पंतवरील खेळाचा ताण कमी करण्याचा आता प्रयत्न होऊ शकेल. कसोटी क्रिकेटसाठी वृद्धिमान साहा दुखापतीतून सावरल्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करीत आहे. जानेवारी २०१८मध्ये साहा अखेरचा कसोटी सामना खेळला होता. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी निवड समिती कोणते पाऊल उचलते, ते पाहणे महत्त्वाचे ठरेल. प्रसाद यांच्या वक्तव्याचे संकेत पडताळल्यास के. एस. भरत, इशान किशन आणि संजू सॅमसन हे तिघे जण दर्जेदार कामगिरीसह भारतीय क्रिकेटचे दरवाजे ठोठावत आहेत. या तिघांची देशांतर्गत आणि भारत ‘अ’ संघाकडून केलेली कामगिरी लक्षणीय आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रेणीनिहाय आर्थिक वर्गीकरणातही पंतचा समावेश ‘अ’ श्रेणीत आहे. परंतु हार्दिक पंडय़ा, लोकेश राहुल, यजुर्वेद्र चहल यांच्यासारखे खेळाडू ‘ब’ श्रेणीत आहेत.

तूर्तास, धोनीच्या समर्थ पर्यायांचा भारतीय क्रिकेटचा शोध अद्याप संपलेला नाही. पंतवर टाकलेला अतिविश्वास आणि ‘प्रतिधोनी’चा शिक्का आता पुसून गेला आहे. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका पंतच्या कारकीर्दीसाठी दिशादर्शक ठरणार आहे.

ऋषभ पंतची कामगिरी

प्रकार सामने डाव  धावा ५०   १००  सर्वोत्तम   सरासरी

कसोटी              ११   १८   ७५४  २    २    १५९* ४४.३५

एकदिवसीय १२   १०   २२९  ०    ०    ४८   २२.९०

ट्वेन्टी-२०  १९   १८   ३०६  २    ०    ६५*  २०.४०

पंतला भारतीय क्रिकेट संघात बऱ्याच प्रमाणात संधी मिळाली आहे. त्याला योग्य क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात येत आहे. कर्णधार, प्रशिक्षक, निवड समिती आणि संघ व्यवस्थापन यांचा विश्वास आणि पाठबळसुद्धा त्याला मिळाले आहे. परंतु त्याला न्याय देता आलेला नाही. तो त्याच चुका पुन्हा करीत आहे. देशाकडून खेळण्यासाठीची परिपक्वता त्याच्यात दिसत नाही. त्यामुळे पंतला चुकांमधून शिकण्यासाठी योग्य धडा देण्याची गरज आहे. विश्वचषकात चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीसाठी पंतसारख्या युवा खेळाडूवर विश्वास टाकणे अयोग्य होते. या क्रमांकावर मातब्बर फलंदाज खेळतात. प्रयोगासाठी विश्वचषक हे व्यासपीठ मुळीच नव्हते!

-चंद्रकांत पंडित, भारताचे माजी यष्टिरक्षक, विदर्भाचे प्रशिक्षक

First Published on September 22, 2019 1:20 am

Web Title: rishabh pant msk prasad team india abn 97