सिडनी कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी रहाणे आणि विहारी लागोपाठ बाद झाल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. मात्र, पंतनं पुजाराच्या साथीनं भारतीय संघाच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला आहे. विहारी धावबाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या पंतनं आक्रमक खेळावर भर दिला. त्यानं ऑसींचा प्रमुख गोलंदाजांची पिटाई केली. पंतच्या आक्रमक खेळीमुळे ऑसींना त्यांचे डावपेच बदलावे लागले. पहिल्या सत्राचे खेळ संपला तेव्हा पंत २९ धावांवर नाबाद आहे.

सिडनी कसोटी सामन्यात २५ धावांचा टप्पा ओलांडताच ऋषभ पंतनं व्हिव्ह रिचर्ड्स यांचा विक्रम मोडीत काढला. आता ऑस्ट्रेलियात लागोपाठ ९ डावांत २५ पेक्षा जास्त धावा काढणारा ऋषभ पंत एकमेव फलंदाज आहे. पंतनं व्हिव्ह रिचर्ड्स यांच्यासह वॅली हॅमोंड आणि रुसी सुर्ती यांचा विक्रम मोडीत काढला. या तिघांनीही ऑस्ट्रेलियात लागोपाठ आठ डावांत २५ पेक्षा जास्त धावा काढल्या होत्या. सिडनी कसोटी ऋषभ पंतनं ( २५, २८, ३६, ३०, ३९, ३३, १५९*, २९ , २९*) हा विक्रम मोडीत काढला आहे. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड, चेतेश्वर पुजारा, लक्ष्मण, धोनी, कपिल देव आणि सुनील गावसकर यांच्यासराख्या दिग्गजांनाही असा कारनामा करता आला नाही. मात्र, ऋषभ पंतनं २३ व्या वर्षीच हा पराक्रम केला आहे.

तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राखेर भारतीय संघानं चार गड्यांच्या मोबदल्यात १८० धावा केल्या आहेत. भारतीय संघ अद्याप १५८ धावांनी पिछाडीवर आहे. ऋषभ पंत २९ आणि पुजारा ४२ धावांवर खेळत आहेत. अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाच्या मदतीला पुन्हा एकदा ऋषभ पंत धावून आला. तिसऱ्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचा संघ वरचढ होतेय असं वाटत असताना पंतनं आक्रमक फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना सळो की पळो केलं. पंत ४५ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीनं २९ धावांवर खेळत आहे. तर पुजारा १४४ चेंडूत ४ चौकारासह ४२ धावांवर खेळत आहे.