06 August 2020

News Flash

….म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा

फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी सांगितलं कारण

भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी गेले काही महिने सतत टीकेचा धनी बनलेल्या ऋषभ पंतला पाठींबा दर्शवला आहे. विश्वचषकानंतर भारतीय निवड समितीने ऋषभ पंतला धोनीच्या जागी संघात स्थान दिलं. मात्र त्याच्या कामगिरीत जराशीही सुधारणा झालेली दिसत नाहीये. सततच्या अपयशी कामगिरीनंतरही ऋषभला भारतीय संघात जागा मिळते आहे. याविषयावक फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी आपलं मत मांडलं.

“ऋषभ पंत प्रचंड प्रतिभावान खेळाडू आहे. त्याच्या गुणवत्तेबद्दल आम्हा सर्वांना खात्री आहे. तो त्याचा खेळ सुधारण्यावर आणि शारिरक तंदुरुस्तीवर भर देतो आहे. सध्या तो चांगला खेळत नसला तरीही यातून तो बाहेर पडेल असा सर्वांना विश्वास आहे. याआधी त्याने मर्यादीत षटकांच्या सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. ज्या क्षणी तो फॉर्मात येईल त्या क्षणाला तो भारतीय संघाचा महत्वाचा खेळाडू बनेल. त्याच्यात सामना जिंकवून देण्याची क्षमता आहे.” पहिल्या वन-डे सामन्याआधी राठोड पत्रकारांशी बोलत होते.

ऋषभ पंतला क्रिकेटमधून काहीकाळ विश्रांती द्यायला हवी का?? असा प्रश्न विचारला असता राठोड म्हणाले, “माझ्या मते ती वेळ अजून आलेली नाहीये. तो अजुनही स्वतःचा खेळ सुधारण्यासाठी प्रचंड मेहनत घेतो आहे. नेट्समध्ये सरावादरम्यान तो चांगल्या फॉर्मात खेळतोय. टी-२० क्रिकेटमध्ये त्याचा खेळ समाधानकारक आहे. मागील टी-२० सामन्यात त्याच्यावर एक जबाबदारी सोपवण्यात आली होती, जी त्याने पूर्ण केली. अशाच प्रकारच्या कामगिरीची त्याच्याकडून अपेक्षा आहे.” टी-२० मालिकेत २-१ ने बाजी मारल्यानंतर भारतीय संघासमोर आता वन-डे मालिकेचं आव्हान असणार आहे. त्यामुळे या मालिकेत ऋषभ पंतची कामगिरी कशी होते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2019 12:56 pm

Web Title: rishabh pant will be massive player once he starts getting runs says vikram rathour psd 91
Next Stories
1 Ind vs WI : भारताचं पारडं जड, पण सामन्यावर पावसाचं सावट
2 ‘सॅफ’ची पदकलूट आणि वास्तव
3 राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा : ठाणे उपांत्यपूर्व फेरीत
Just Now!
X