22 November 2019

News Flash

विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा : फेडरर-नदाल लढतीची आज पर्वणी!

फेडरर आणि नदाल यापूर्वी २००८ मध्ये अंतिम फेरीत एकमेकांविरुद्ध खेळले होते.

स्वित्र्झलडचा रॉजर फेडरर आणि स्पेनचा राफेल नदाल

निशिकोरी, क्युरे यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात; जोकोव्हिचची गाठ बॉटिस्टाशी

लंडन : कोणत्याही खेळातील दोन मातब्बर खेळाडू जेव्हा एकमेकांविरुद्ध खेळतात, तेव्हा चाहत्यांना चुरशीच्या लढतीची अपेक्षा असते. लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या शुक्रवारी रंगणाऱ्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत स्वित्र्झलडचा रॉजर फेडरर आणि स्पेनचा राफेल नदाल आमनेसामने येणार असल्यामुळे सर्व टेनिसविश्वाचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.

या दोघांनी अनुक्रमे केई निशिकोरी आणि सॅम क्युरे यांच्यावर विजय मिळवून अंतिम चार खेळाडूंमधील स्थान पक्के केले. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात सर्बियाचा अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिच आणि स्पेनचा २३वा मानांकित रॉबटरे बॉटिस्टा यांच्यातील द्वंद्व चाहत्यांना पाहायला मिळेल.

जागतिक टेनिस क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असणाऱ्या दुसऱ्या मानांकित फेडररने उपांत्यपूर्व लढतीत जपानच्या आठव्या मानांकित केई निशिकोरीला ४-६, ६-१, ६-४, ६-४ असे चार सेटमध्ये पराभूत केले. तर यंदाच्या फ्रेंच टेनिस स्पर्धेच्या विजेत्या तिसऱ्या मानांकित नदालने अमेरिकेच्या सॅम क्युरेवर ७-५, ६-२, ६-२ अशी मात करून उपांत्य फेरी गाठली.

तब्बल ११ वर्षांनी योगायोग

फेडरर आणि नदाल यापूर्वी २००८ मध्ये अंतिम फेरीत एकमेकांविरुद्ध खेळले होते. त्यानंतर प्रथमच विम्बल्डनमध्ये हे दोघे आमनेसामने येणार असल्यामुळे या सामन्याला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. विम्बल्डनच्या अधिकृत ट्विटर संकेतस्थळानेसुद्धा २००८ मधील या दोन्ही खेळाडूंचा चषकासह छायाचित्र टाकून जुन्या आठवणींना उजाळा दिला. २००८ मध्ये चार तास आणि ४८ मिनिटे रंगलेल्या त्या अंतिम लढतीत नदालने फेडररला ६-४, ६-४, ६-७ (५-७), ६-७ (८-१०), ९-७ असे पाच सेटमध्ये नमवले होते. या सामन्यापूर्वी फेडररने सलग दोन वेळा विम्बल्डनचे विजेतेपद मिळवले होते.

नदालविषयी मी काय बोलणार. स्पर्धेच्या सुरुवातीपूर्वीच चाहते आम्ही दोघे कोणत्या फेरीत आमनेसामने येऊ, याकडे लक्ष ठेवून असतात. नदालसारख्या मातब्बर खेळाडूविरुद्ध तुम्ही कोणत्याही क्षणी गाफील राहू शकत नाही. चाहते या सामन्याला फार महत्त्व देतात, परंतु आम्ही फक्त नेहमीच्या सामन्याप्रमाणेच याकडे पाहतो.

– रॉजर फेडरर, स्वित्र्झलडचा टेनिसपटू

फेडररविरुद्ध खेळताना मला नेहमीच मजा येते. ११ वर्षांनी पुन्हा विम्बल्डनच्या हिरवळीवर फेडररविरुद्ध खेळताना मला २००८ प्रमाणेच सर्वस्व पणाला लावावे लागेल, यात शंका नाही. वयाची तिशी ओलांडूनही आम्ही दोघे एकमेकांविरुद्ध अनेक वेळा खेळलो आहोत. त्यामुळे आजच्या सामन्याचेही माझ्यावर फारसे दडपण नाही.

– राफेल नदाल,  स्पेनचा टेनिसपटू

 

First Published on July 12, 2019 2:30 am

Web Title: roger federer rafael nadal meet at wimbledon 2019 first time after 11 year zws 70
Just Now!
X