इंग्लंडविरोधात काल(दि.२३) पुण्यामध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने पाहुण्या संघाचा ६६ धावांनी धुव्वा उडवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पण, या सामन्यादरम्यान भारतीय संघातील दोन महत्त्वाचे खेळाडू जायबंदी झालेत.

टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा आणि मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर हे दोघं पहिल्या एकदिवसीय सामन्यात जायबंदी झाले. बीसीसीआयने याबाबत माहिती दिली. क्षेत्ररक्षण करताना श्रेयस अय्यरच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली, त्यामुळे श्रेयसला मैदानातून बाहेर जावं लागलं. त्याच्याजागी शुबमन गिल क्षेत्ररक्षणासाठी आला. इंग्लंड फलंदाजी करत असताना आठव्या षटकात शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टोने मारलेला शॉट अडवताना श्रेयस अय्यर जखमी झाला. तर, भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा फलंदाजी करताना जखमी झाला. डावाच्या पाचव्या षटकात उजव्या हाताच्या कोपरावर मार्क वूडचा चेंडू लागल्याने तो जखमी झाला. तरीही त्याने मैदान सोडलं नाही, आणि संघासाठी २८ धावांचं योगदान दिलं. रोहितच्या जागी सूर्यकुमार यादव क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला होता. आता उर्वरित 2 सामन्यांपर्यंत जर दोन्ही खेळाडूंची प्रकृती सुधारली नाही तर दोघंही एकदिवसीय मालिकेतून बाहेर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, असं झाल्यास हा भारतीय संघासाठी मोठा धक्का ठरू शकतो.

आणखी वाचा- Ind vs Eng : दुसऱ्या वनडेमध्ये सूर्यकुमार यादवला मिळणार संधी? श्रेयस अय्यर झाला जायबंदी


दरम्यान, पहिल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडपुढे ३१८ धावांचे आव्हान ठेवले होते. पण प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ फक्त 251 धावाच करु शकला. आता तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी होणार असून या सामन्यातही विजय मिळवून कसोटी, टी-२० आणि एकदिवसीय मालिकाही खिशात घालायचा टीम इंडियाचा प्रयत्न असणार आहे.