न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे मालिकेत बीसीसीआयने विराट कोहलीला विश्रांती देऊन उप-कर्णधार रोहित शर्माच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा सोपवली. रोहितचा वन-डे कारकिर्दीतला हा 200 वा सामना ठरला आहे. 200 व्या सामन्यात कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली असल्यामुळे आजच्या सामना रोहितसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय वन-डे क्रिकेटचा सलामीचा फलंदाज ते संघाचा उप-कर्णधार असा प्रवास करणाऱ्या रोहित शर्माने वन-डे संघातलं आपलं स्थान पक्क केलं आहे. 200 वा सामना खेळणारा तो भारताचा 14 वा क्रिकेटपटू ठरला आहे.

भारतीय संघात पदार्पण केल्यापासून आपला 200 वा सामना खेळेपर्यंत रोहितने आपल्या फलंदाजीत अधिकाधिक सुधारणा केली आहे. सामन्यागणित रोहितच्या बॅटमधून निघणारा धावांचा ओघ, आणि फलंदाजीची सरासरी ही वाढतेच आहे.

मात्र आजच्या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी ‘हिटमॅन’ने गमावली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत केवळ 2 फलंदाजांना आपल्या 200 व्या सामन्यात शतकी खेळी करता आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा एबी डीव्हिलीयर्स आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने ही कामगिरी केली आहे. एबी ने 2016 साली इंग्लंडविरुद्ध केप टाऊनमध्ये तर विराटने 2017 साली न्यूझीलंडविरुद्ध मुंबईत शतक झळकावलं होतं. रोहित शर्मा आजच्या सामन्यात अवघ्या 7 धावांवर ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर माघारी परतला.

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारताने चौथ्या सामन्यात शुभमन गिलला संधी दिली. मात्र ट्रेंट बोल्ट आणि कॉलिन डी ग्रँडहोमच्या भेदक माऱ्यासमोर तो फारकाळ तग धरु शकला नाही.