भारताचा सलामी फलंदाज रोहित शर्मा सध्या आपल्या कारकिर्दीच्या सर्वोच्च फॉर्ममध्ये आहे. विश्वचषकात पाच शतकांसह सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजामध्ये रोहित शर्मा अव्वल स्थानावर आहे. या तुफान फॉर्ममुळे रोहित शर्मा आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत विराट कोहलीच्या जवळ पोहचला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मामध्ये फक्त सहा गुणांचा फरक आहे. ८९१ गुणांसह विराट कोहली आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. तर ८८५ गुणांसह रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे.

कोहलीने विश्वचषकात ६३.१४ च्या सरासरीने ४४२ धावा केल्या आहेत. या कामगिरीचा विराट कोहलीला एका गुणांचा फायदा झाला आहे. ८९० गुणांवरून विराट कोहली ८९१ गुणांवर पोहचला आहे. विश्वचषकाआधी विराट आणि रोहित शर्मामध्ये ५१ गुणांचा फरक होता. पण आता फक्त हे अंतर सहा गुणांवर आले आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी आयसीसीने क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये रोहित शर्मा आपल्या सर्वोत्कृष्ट रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे.

पाकिस्तानचा बाबर आजम फलंदाजीच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा ड्युप्लिसिस चौथ्या स्थानावर आहे. पाचव्या स्थानावर केन विल्यमसन आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज वॉर्नर सहाव्या स्थानावर आहे.

एकदिवसीय क्रमवारीत भारतीय खेळाडूचा दबदबा कायम आहे. गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह अव्वल स्थानावर कायम आहे. बुमराहने विश्वचषकात १७ बळी घेतले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडच्या बोल्ट आणि बुमराहमध्ये ५६ गुणांचा फरक आहे. तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स आहे. तर रबाडा चौथ्या आणि ताहिर पाचव्या स्थानावर आहेत.

आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत इंग्लंड संघाने पुन्हा एकदा अव्वल स्थान काबिज केले आहे. भारत दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंड आणि भारताचे गुण सारखेच आहेत. मात्र काही दोघांमध्ये काही दशंअंश गुणांचा फरक असल्यामुळे इंग्लंड पहिल्या क्रमांकावर आहे. भारत आणि इंग्लंडचे १२३ गुण आहेत. न्यूझीलंड तिसऱ्या तर ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानावर आहे.