न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात रोहित शर्माने दमदार खेळीच्या जोरावर सामनावीर पुरस्कारावर नाव कोरले. या सामन्यात त्याने १३८ चेंडूत १४७ धावांची खेळी केली. यात त्याने १८ चौकार आणि दोन उत्तुंग षटकार खेचले. या सामन्यातील दोन षटकारांच्या मदतीने रोहितच्या नावे एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५२ षटकार झाले आहेत. भारताकडून दिडशे षटकारांचा टप्पा पार करणारा रोहित पाचवा भारतीय आहे. त्याने सर्वात कमी डावात हा टप्पा ओलांडला आहे. त्याच्यापूर्वी सर्वात कमी डावात १५० षटकार खेचण्याचा पराक्रम धोनीने केला होता. धोनीने १९२ सामन्यात १५० षटकारांचा टप्पा पूर्ण केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद गतीने १५० षटकारांचा टप्पा पूर्ण करण्याचा पराक्रम पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे.

आफ्रिदीने केवळ १६० डावात १५० षटकार मारले होते. रोहितने हा टप्पा १६५ डावांत पूर्ण केला. आजच्या सामन्यासह १६६ डावात रोहितच्या नावावर १५२ एकदिवसीय षटकारांची नोंद झाली. या सामन्यातील दहाव्या षटकात रोहितने मारलेल्या षटकाराने नॉन स्ट्राईकवर असणाऱ्या कोहलीला थक्क केले. कर्णधार कोहलीने चेहऱ्यावरील हावभावाने उपकर्णधारच्या षटकाराला दाद दिल्याचे पाहायला मिळाले. अ‍ॅडम मिलनेच्या गोलंदाजीवर रोहितने पुढे येऊन अफलातून षटकार मारला होता.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५० षटकारांचा टप्पा पूर्ण करणारा रोहित शर्मा पाचवा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकरने (३४३), सौरव गांगुली (२२६), युवराज सिंग (२७०), आणि महेंद्रसिंह धोनीने १९२ डावात १५० षटकार मारले होते. रोहितने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात कारकिर्दीतील १६ वे शतक झळकावले. याचसोबत कानपूरच्या मैदानात जे विराट आणि सचिनला जमलं नाही तो पराक्रम रोहितने करुन दाखवला. या मैदानात दोनवेळा त्याने शतकी खेळी केली आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्याविरुद्ध रोहितने १५० धावांची खेळी केली होती. याशिवाय आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोनवेळा द्विशतक झळकवणारा रोहित शर्मा एकमेव खेळाडू आहे.