न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका ५-० ने जिंकल्यानंतर भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. न्यूझीलंडविरुद्ध अंतिम टी-२० सामन्यात रोहित शर्माने लोकेश राहुलसोबत संघाचा डाव सावरताना ६० धावांची खेळी केली होती. मात्र फलंदाजीदरम्यान त्याच्या पोटरीचे स्नायू दुखावल्यामुळे त्याने फिजीओच्या मदतीने मैदान सोडणं पसंत केलं. विराटच्या अनुपस्थितीत रोहित भारतीय संघाचं नेतृत्व करत होता, पण तो देखील दुखापतीमुळे संघाबाहेर गेल्यानंतर लोकेश राहुलने संघाचं नेतृत्व केलं. पीटीआय वृत्तसंस्थेने यासंदर्भातली माहिती दिलेली आहे.

दरम्यान रोहितची जागा संघात कोणता खेळाडू घेणार हे अजुन स्पष्ट झालेलं नसलं तरीही काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या बातमीनुसार मयांक अग्रवालची भारतीय संघात निवड करण्यात आलेली आहे. २०१९ वर्षात वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्यात मयांकला वन-डे संघात जागा मिळाली होती, मात्र त्याला अंतिम ११ जणांच्या संघात खेळण्याची संधी मिळालेली नव्हती. त्यामुळे वन-डे मालिकेत भारतीय संघ कोणती रणनिती घेऊन मैदानात उतरतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा अद्याप व्हायची आहे.