भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक निवडण्याचे अधिकार असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीत माजी खेळाडू सचिन तेंडुलकर आणि व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यांचं पुनरागमन होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात सचिन आणि लक्ष्मण यांनी आपल्या सल्लागार समितीचा राजीनामा दिला होता. सध्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सुत्र सांभाळणारा सौरव गांगुलीही सल्लागार समितीचा अध्यक्ष होता.

“सचिन आणि लक्ष्मण लवकरच क्रिकेट सल्लागार समितीत पुनरागमन करु शकतात.” बीसीसीआयमधील सुत्रांनी नाव न घेण्याच्या अटीवर पीटीआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. १ डिसेंबर रोजी मुंबईत बीसीसीआयच्या मुख्यालयात वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली जाणार आहे. याआधी बीसीसीआयच्या सर्वोच्च समितीची शनिवारी बैठक पार पडेल, यात सचिन-लक्ष्मणच्या पुनरागमनाबद्दल निर्णय घेतला जाईल. लाभाचं पद भूषवल्याच्या तक्रारीनंतर सचिन आणि लक्ष्मणला आपल्या सल्लागार समिती सद्याचा राजीनामा द्यावा लागला होता.