जलतरणात भारतीय खेळाडूंचा दर्जा उंचवावा यासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साइ) ऑस्ट्रेलियन क्रीडा अकादमीबरोबर करार केला आहे. त्यानुसार या अकादमीची एक शाखा येथील शामाप्रसाद मुखर्जी जलतरण तलाव येथे राहणार आहे.
ऑस्ट्रेलियन क्रीडा अकादमी ही ऑस्ट्रेलियातील व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षण व रोजगार संस्था या शासकीय संस्थेची उपसंस्था आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली साइची राष्ट्रीय जलतरण अकादमीत प्रशिक्षण दिले जाणार आहे. राष्ट्रीय अकादमीबरोबरच साइच्या अन्य शाखांमध्येही त्यानुसार प्रशिक्षण दिले जाईल. राष्ट्रीय अकादमीत सराव करणाऱ्या खेळाडूंच्या शिबिरांचे व्यवस्थापन, कामगिरीचा आढावा याबरोबरच परदेशी प्रशिक्षकांच्या कामगिरीचाही आढावा घेतला जाणार आहे. खेळाडू व प्रशिक्षकांपुढे काही ध्येये निश्चित केली जातील आणि त्यानुसार त्यांची कामगिरी होत आहे की नाही याचा आढाव घेण्याची जबाबदारीही ऑस्ट्रेलियन अकादमीकडे सोपविली जाणार आहे.
वरिष्ठ, कुमार, सबज्युनिअर गटाच्या राष्ट्रीय संघांतील खेळाडूंना या अकादमीचा फायदा मिळणार आहे. त्याचबरोबर क्रीडा वैद्यक तज्ज्ञ, क्रीडा शास्त्र याबाबतही तेथे मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याकरिता लष्करी क्रीडा वैद्यकीय महाविद्यालय, संरक्षण मंत्रालय यांचे सहकार्य मिळणार आहे.