भारताची ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला सिंगापूर सुपर सीरिज बॅडमिंटनमध्ये शुक्रवारी धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. उपांत्यपूर्व फेरीत तिला इंडोनेशियाच्या लिंडावेनी फानेत्री हिने १७-२१, २१-१३, २१-१३ असे हरवले.
एक तासापेक्षा कमी वेळेत झालेल्या या लढतीत दोन्ही खेळाडूंनी पहिल्या गेममध्ये चुरशीने खेळ केला. पहिल्या दहा गुणांपर्यंत दोघींची वाटचाल तोडीस तोड होती. त्यानंतर सायनाने तीन गुण घेत १४-११ अशी आघाडी घेतली. तिने १७-११ अशी आघाडी वाढविली, मात्र फानेत्रीने जिद्दीने खेळ करीत ही आघाडी १८-१७ अशी कमी केली. सायनाने पुन्हा सफाईदार खेळ करीत हा गेम मिळवला. दुसऱ्या गेममध्ये फानेत्रीने स्मॅशिंगच्या जोरदार फटक्यांचा उपयोग करीत ७-४ अशी आघाडी घेतली. स्मॅशचे बहारदार फटके व नेटजवळून प्लेसिंगचा उपयोग करीत फानेत्रीने १९-१० असे अधिक्य मिळविले. हा गेम घेत तिने सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली.
तिसऱ्या गेमबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली. दुसरी गेम घेतल्यामुळे फानेत्रीचा आत्मविश्वास उंचावला. १२-३ अशी भक्कम आघाडी घेत फानेत्रीने सायनाच्या विजयाच्या आशा संपुष्टात आणल्या. सायनाने आणखी सहा गुण मिळविले, मात्र फानेत्रीनेही हळूहळू आघाडी बळकट करीत हा सामना जिंकला. अन्य भारतीय खेळाडूंचे आव्हान आपापल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यांतच संपुष्टात आले आहे.