‘भारताची फुलराणी’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या सायना नेहवालने अखेर जागतिक क्रमवारीचे शिखर पादाक्रांत केले. ऑलिम्पिक कांस्यपदकावर मोहोर उमटवणाऱ्या सायनाने बॅडमिंटन जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली. या स्थानावर पोहोचणारी सायना पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. यापूर्वी १९८० साली प्रकाश पदुकोण यांनी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते. बॅडमिंटन विश्वात सातत्यपूर्ण प्रदर्शनासह आता क्रमवारीत अव्वल स्थान गाठत सायनाने भारताचा झेंडा अभिमानाने फडकवला. क्रमवारीत अव्वल स्थान गाठण्यासाठी सायनाला दिल्लीत सुरू असलेल्या भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपान्त्य फेरीत विजय मिळवणे आवश्यक होते.