वर्षांचा शेवट विजेतेपदासह करण्याची इच्छा असलेल्या सायना नेहवाल आणि किदम्बी श्रीकांतने बीडब्ल्यूएफ वर्ल्ड सुपर सीरिज फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेत दिमाखदार खेळासह उपांत्य फेरीत आगेकूच केली.
जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या सायनाने कोरियाच्या बे यिआन ज्यू हिच्यावर १५-२१, २१-७, २१-१७ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत स्थान पटकावले. श्रीकांतला गटातल्या शेवटच्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले, मात्र आधीच्या दोन लढतीत विजयांसह श्रीकांतने उपांत्य फेरीत स्थान पटकावले.
एकमेकींशी साधम्र्य साधणाऱ्या शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सायना आणि ज्यू यांच्यात रंगलेल्या मुकाबल्यात ज्यूने अफलातून खेळ करत पहिला गेम नावावर केला. आव्हान जिवंत राखण्यासाठी दुसरा गेम जिंकणे अनिवार्य असणाऱ्या सायनाने ६-२ अशी आघाडी मिळवली. स्मॅशेसऐवजी सोप्या फटक्यांवर सायनाने भर दिला. मात्र ज्यूने ६-६ अशी बरोबरी केली. मात्र थकव्यामुळे ज्यूच्या हातून भरपूर चुका झाल्या. १२-६ अशा स्थितीत असताना तब्बल ३२ फटक्यांच्या रॅलीत सायनाने बाजी मारली. ही आघाडी वाढवत सायनाने दुसरा गेम जिंकला.
तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये ज्यूने ५-१ अशी आघाडी घेतली. स्मॅशचे अस्त्र बाहेर काढत सायनाने पिछाडी भरून काढली. १५-१३ अशा स्थितीतून सायनाने नेटजवळच्या सुरेख खेळासह आगेकूच केली. ज्युच्या स्वैर खेळाचा फायदा उठवत सायनाने तिसऱ्या गेमसह सामन्यावर कब्जा केला.
डेन्मार्कच्या जॅन जॉरगेनसेनने श्रीकांतवर १७-२१, २१-१२, २१-१४ अशी मात केली. जॉरगेनसेन, श्रीकांत आणि केंटो मोमोटा यांच्यात उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी जोरदार चुरस होती. जॉरगेनसनने गटात अव्वल तर श्रीकांतने दुसऱ्या स्थानासह उपांत्य फेरी गाठली. पहिल्या गेमध्ये श्रीकांतने तडफदार खेळासह विजय मिळवला. मात्र पुढच्या दोन गेम्समध्ये जॉरगेनसेनच्या सर्वागीण खेळासमोर श्रीकांत निष्प्रभ ठरला.