भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, बी. साई प्रणीत, किदम्बी श्रीकांत व समीर वर्मा यांच्या पराभवामुळे ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या सायनाला महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत चायनीज तैपेईच्या ताइ झू यिंगकडून १५-२१, १६-२१ असा पराभव स्वीकारावा लागला.
पुरुष एकेरीत साई प्रणीतने पहिल्याच फेरीत ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा रौप्यपदक मिळवणाऱ्या ली चोंग वेईवर सनसनाटी विजय मिळवला होता. मात्र दुसऱ्या फेरीत त्याला डेन्मार्कच्या हान्स ख्रिस्तियन व्हिटिंगसने १२-२१, २१-११, २१-१६ असे पराभूत केले. प्रणीतने पहिल्या गेममध्ये दिमाखदार सुरुवात केली होती. नंतर त्याला स्वत:च्या खेळावर नियंत्रण ठेवता आले नाही. शेवटच्या गेममध्ये त्याने झुंजार लढत देण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पराभव टाळू शकला नाही.
श्रीकांतला जपानच्या केन्तो मोमोता या चौथ्या मानांकित खेळाडूपुढे आपला प्रभाव दाखवता आला नाही. मोमोताने त्याचा २१-१०, २१-१३ असा सरळ दोन गेम्समध्ये पराभव केला. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळवणाऱ्या समीरने चीनच्या तियान होउवेईला कौतुकास्पद लढत दिली, मात्र चुरशीच्या लढतीत त्याला २१-१०, १२-२१, १९-२१ असा पराभव स्वीकारावा लागला.