मलेशियन ग्रां.प्रि स्पर्धेत नुकतेच विजेतेपद मिळविणाऱ्या सायना नेहवालने सय्यद मोदी चषक बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे. तिच्या अनुपस्थितीत ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूला विजेतेपदाची संधी आहे. ही स्पर्धा येथे मंगळवारपासून सुरू होत आहे.

सायनाने येथील स्पर्धेत तीन वेळा विजेतेपद मिळविले आहे. गुडघ्यावरील शस्त्रक्रियेनंतर काही दिवस तिला स्पर्धात्मक बॅडमिंटनपासून दूर राहावे लागले होते. मलेशियन स्पर्धेतील विजेतेपद हे तिच्यासाठी यशस्वी पुनरागमन आहे. येथे ती सहभागी होईल अशी अपेक्षा होती, मात्र तिने अनपेक्षितरीत्या येथील स्पर्धेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत तिने सांगितले, ‘प्रीमिअर लीग व त्यानंतर मलेशियन ओपन स्पर्धा यामुळे सलग तीन आठवडे मी खेळतच आहे. मला थोडीशी विश्रांती आवश्यक होती.’

सिंधूने ऑलिम्पिकमधील रौप्यपदकानंतर चीन ओपन प्रीमिअर स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते, तसेच तिने हाँगकाँग ओपन स्पर्धेत उपविजेतेपद पटकावत जागतिक सुपरसीरिजमधील मुख्य स्पर्धेत स्थान निश्चित केले होते.