श्रीकांतचे आव्हान संपुष्टात
भारताच्या सायना नेहवालने ऑस्ट्रेलियन बॅडिमटन सुपरसीरिजमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळवले असून प्रथमच तिला या स्पर्धेचे विजेतेपद पटकवण्याची संधी असेल. मात्र भारताच्या किदम्बी श्रीकांतला पुरुष गटात उपांत्य फेरीतच पराभव स्वीकारावा लागला.
सायनाने उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीतील द्वितीय मानांकित खेळाडू यिहान वाँग हिच्यावर २१-८, २१-१२ असा सहज विजय मिळविला. वाँग हिने २०११ मध्ये विश्वविजेतेपद, तर २०१२ च्या ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळविले होते. सायनाची अंतिम फेरीत चीनची सुआन यु हिच्याशी गाठ पडणार आहे. सुआनने तिसऱ्या मानांकित लिउ झुईरुई हिचे आव्हान संपुष्टात आणले.
सायनाने २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते मात्र सुपरसीरिजमध्ये तिला विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. सायनाने आतापर्यंत सुआनविरुद्धच्या सहा लढतींपैकी पाच लढतींमध्ये विजय मिळविला आहे.
श्रीकांतला उत्कंठापूर्ण सामन्यात डेन्मार्कच्या हान्स क्रिस्तिन व्हिटिंघूसकडून २०-२२, १३-२१ असा पराभव स्वीकारावा लागला.
सायनाने यिहानविरुद्ध अतिशय प्रभावी खेळाचा प्रत्यय घडविला. तिने नियोजनबद्ध खेळ केला. तिने पहिल्या गेममध्ये १५-६ अशी आघाडी मिळविली. तिने आघाडी कायम ठेवीत हागेम जिंकला. पहिल्या गेमप्रमाणेच दुसऱ्या गेममध्येही तिने स्मॅशिंग व प्लेसिंगचा बहारदार खेळ केला. तिने सुरुवातीपासूनच आघाडी मिळविली. ११-४ अशा भक्कम आघाडीनंतर शेवटपर्यंत वर्चस्व ठेवीत विजयावर शिक्कामोर्तब केले.