सायना नेहवाल पुढील वर्षी रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पदक मिळविल, मात्र त्यासाठी तिला खूप अवघड आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे, असे सायनाचे प्रशिक्षक व माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू यू. विमलकुमार यांनी सांगितले.
महाराष्ट्र बॅडमिंटन लीगच्या समारोप समारंभाचे मुख्य अतिथी म्हणून विमलकुमार येथे आले होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, लंडन येथील २०१२च्या ऑलिम्पिकमध्ये सायना हिने कांस्यपदक मिळविले होते. मात्र त्यानंतर तिच्या कामगिरीत अनेक चढउतार आले होते. प्रत्येक खेळाडूला काही वेळा अपयशाच्या मालिकेस तोंड द्यावे लागते. आता पुन्हा ती विजयपथावर आली आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये पुन्हा पदक मिळविण्याची क्षमता तिच्याकडे आहे. मात्र आता जागतिक स्तरावर चीनबरोबरच दक्षिण कोरिया, इंडोनेशिया व जपानच्या अनेक खेळाडू अव्वल कामगिरी करू लागल्या आहेत. हे लक्षात घेऊन तिला पदक मिळविण्यासाठी सर्वोत्तम कौशल्य दाखवावे लागणार आहे.
पद्मभूषण सन्मानासाठी सायना ही योग्यच आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने पुढाकार घेतल्यानंतर हा सन्मान मिळण्याचा तिचा मार्ग मोकळा झाला आहे असे सांगून विमलकुमार म्हणाले, राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांकरिता खेळाडूंकडून अर्ज मागण्याऐवजी शासनाने स्वत:हूनच त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
जागतिक स्तरावर दुहेरीत चमक दाखविण्याची क्षमता भारतीय खेळाडूंमध्ये आहे, मात्र या खेळाडूंना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी परदेशी प्रशिक्षकांची आवश्यकता आहे. दुहेरीसाठी योग्य नैपुण्य शोधून त्याच्या विकासाकरिता भारतीय बॅडमिंटन महासंघाने (बीएआय) विशेष प्रयत्न केले पाहिजेत. बॅडमिंटनच्या विकासाकरिता अनेक ज्येष्ठ खेळाडू उत्सुक आहेत, मात्र त्यांना संघटनेकडून सहकार्य मिळण्याची गरज आहे असेही विमलकुमार यांनी सांगितले.
बॅडमिंटन लीगचे कौतुक करीत ते म्हणाले, या लीग स्पर्धामध्ये अव्वल दर्जाच्या खेळाडूंचा सहभाग वाढविण्यासाठी बीएआयने वर्षभरातील स्पर्धाची कार्यक्रमपत्रिका निश्चित करताना लीगसाठी विशिष्ट कालावधी दिला पाहिजे.