क्वालालम्पूर : सायना नेहवाल आणि विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधूने वर्चस्वपूर्ण कामगिरीचे प्रदर्शन करताना गुरुवारी मलेशिया मास्टर्स खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

सहाव्या मानांकित सिंधूने ३४ मिनिटे चाललेल्या सामन्यात जपानच्या अया ओहोरीचा २१-१०, २१-१५ असा पराभव केला. सिंधूचा ओहोरीविरुद्ध मिळवलेला हा सलग नववा विजय ठरला.

गतवर्षी बॅसेल येथे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या २४ वर्षीय सिंधूची उपांत्यपूर्व फेरी जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या ताय झू यिंगशी गाठ पडणार आहे. ताय झू हिने दक्षिण कोरियाच्या संग जि ह्य़ूनवर २१-१८, १६-२१, २१-१० असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.

इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धा जिंकल्यानंतर अन्य स्पर्धामध्ये झगडणाऱ्या सायनाने दक्षिण कोरियाच्या आठव्या मानांकित अ‍ॅन सी यंगचा २५-२३, २१-१२ असा पराभव केला. सायनाचा हा अ‍ॅनवरील पहिला विजय ठरला. गतवर्षी फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात अ‍ॅनने सायनाला नमवले होते. दोन वेळा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या सायनाला पुढील फेरीत ऑलिम्पिक विजेत्या कॅरोलिना मरिनशी सामना करावा लागणार आहे. समीर वर्मा आणि एच. एस. प्रणॉय यांच्या पराभवांमुळे भारताचे पुरुष एकेरीतील आव्हान संपुष्टात आले.