लखनौ : ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने माघार घेतल्यानंतर आता सायना नेहवाल आणि किदम्बी श्रीकांत यांच्यावर मंगळवारपासून सुरू होणाऱ्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पध्रेत भारताच्या आव्हानाची धुरा असेल.

मागील वर्षी स्पध्रेचे विजेतेपद पटकावणाऱ्या सिंधूने जागतिक मालिकेच्या अंतिम टप्प्याच्या तयारीसाठी माघार घेतली आहे.  पुरुषांमध्ये समीर वर्मापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी ही जोडीसुद्धा जेतेपद राखण्यासाठी प्रयत्नशील राहील.

सिंधूच्या अनुपस्थितीत सर्वाचे लक्ष राष्ट्रकुल सुवर्ण आणि आशियाई कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालवर असेल. तिने चालू वर्षांत जानेवारीमध्ये इंडोनेशिया मास्टर्स आणि ऑक्टोबरमध्ये डेन्मार्क स्पध्रेची अंतिम फेरी गाठली होती. तिची सलामी मॉरिशसच्या केट फू कुनेशी होणार आहे. यंदाच्या वर्षांतील पहिलेवहिले जेतेपद मिळवण्यासाठी ती उत्सुक आहे. अंतिम फेरीत तिला चीनच्या माजी ऑलिम्पिक विजेत्या लि शुएरुईचे आवहान असेल.

मागील वर्षी चार विजेतेपदांना गवसणी घालणारा श्रीकांतसुद्धा हंगामातील पहिल्या विजेतेपदासाठी उत्सुक आहे. त्याने राष्ट्रकुल स्पध्रेत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.