बिपलाब समंतराय याचे शानदार शतक होऊनही ओडिशाचा पहिला डाव ३११ धावांत रोखण्यात महाराष्ट्राने यश मिळविले. त्यानंतर पहिल्या डावात बिनबाद १२६ धावा करीत त्यांनी रणजी क्रिकेट सामन्यात ओडिशास चोख उत्तर दिले.
गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात ओडिशाने ५ बाद २२३ धावांवर पहिला डाव पुढे सुरू केला. समंतरायचे शतक व त्याने हलदर दास याच्या साथीत केलेली ११७ धावांची भागीदारी हेच ओडिशाच्या डावाचे वैशिष्टय़ ठरले. फलंदाजीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर महाराष्ट्राच्या हर्षद खडीवाले व चिराग खुराणा यांनी अखंडित शतकी भागीदारी रचत धडाकेबाज सलामी केली.
ओडिशाचे उर्वरित पाच बळी महाराष्ट्राचे गोलंदाज किती झटकन मिळवितात हीच पहिल्या सत्राच्या खेळाबाबत उत्सुकता होती. मात्र समंतराय व दास यांनी महाराष्ट्राच्या गोलंदाजांना आत्मविश्वासाने उत्तर देत संघास समाधानकारक धावसंख्या उभारण्यात यश मिळविले. त्यांनी सहाव्या विकेटसाठी ११७ धावांची भर घातली. दास याला श्रीकांत मुंढे याने बाद करीत ही जोडी फोडली. दास याने सात चौकार व एक षटकारासह ४८ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर समंतराय याने दीपक बेहरा (२२) याच्या साथीत ३२ धावांची भागीदारी केली. समंतराय याने दहा चौकार व दोन षटकारांसह १०६ धावा टोलविल्या.
महाराष्ट्राकडून मुंढे याने १०३ धावांमध्ये चार बळी घेतले. डॉमिनिक मुथ्थुस्वामी याने ५७ धावांमध्ये तीन गडी बाद केले. खडीवाले व खुराणा या महाराष्ट्राची अनुभवी सलामीची जोडी फोडण्यासाठी ओडिशाकडून सहा गोलंदाजांचा उपयोग करण्यात आला मात्र त्यांच्या माऱ्याचा कोणताही परिणाम या जोडीवर झाला नाही. खडीवाले याने बारा चौकारांसह नाबाद ७६ धावा केल्या. खुराणा याने केलेल्या नाबाद ४८ धावांमध्ये नऊ चौकारांचा समावेश होता.