सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धा

गतविजेता समीर वर्मा, सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी शानदार विजयांसह सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पध्रेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

तीन वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या द्वितीय मानांकित सायनाने अमोलिका सिंह सिसोडियाचा २१-१४, २१-९ असा पराभव केला. याचप्रमाणे २०१२ आणि २०१५मध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या कश्यपने इंडोनेशियाच्या फिर्मन अब्दुल खोलिकचा ९-२१, २२-२०, २१-८ असा पाडाव केला. कश्यपची उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या सिथ्थीकोम थमासिनशी लढत होणार आहे. तृतीय मानांकित समीरने चीनच्या झाओ जुनपेंगला २२-२०, २१-१७ अशा फरकाने नमवले. पुढील फेरीत त्याची चीनच्याच झोऊ झेकीशी गाठ पडणार आहे.

माजी ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाचा उपांत्यपूर्व फेरीत आठव्या मानांकित ऋतुपर्णा दासशी सामना होणार आहे. ऋतुपर्णाने श्रुती मुंदडाचा २१-११, २१-१५ असा पराभव केला. चौथ्या मानांकित बी. साईप्रणितने इंडोनेशियाच्या शेसार हिरेन रुस्टाव्हिटोचा २१-१२, २१-१० असा पराभव केला. याचप्रमाणे चीनच्या लू गुआंगझूने शुभंकर डे याला २१-१३, २१-१० असे नामोहरम केले.