भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) सोमवारी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीचा १५ जणांचा संभाव्य भारतीय संघ जाहीर केला. निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी यावेळी भारतीय संघ समतोल असून, विराटच्या नेतृत्त्वाखालील संघ विजयी रथ कायम राखेल असा विश्वास व्यक्त केला. कसोटी क्रिकेटमधील कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह असलेल्या रोहित शर्माचा देखील संघात समावेश करण्यात आला आहे. रोहितच्या निवडीची संदीप पाटील यांनी पाठराखण केली. रोहित न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी करेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामुळे संघात मोठे बदल न करण्याचाच निर्णय घेण्यात आला आहे. सध्याचा संघ समतोल असल्याच्या भावनेशी संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे, कर्णधार विराट कोहली देखील सहमत आहेत.

वाचा: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात रोहित शर्माचा समावेश, बिन्नीला डच्चू

रोहित शर्माच्या निवडीबाबत विचारण्यात आले असता संदीप पाटील म्हणाले की, रोहित हा उत्कृष्ट खेळाडू आहे. भारतीय मातीत त्याचा फॉर्म खूप चांगला पाहायला मिळाला आहे. खरंतर रोहितला कसोटी क्रिकेटमध्ये आजवर पुरेशी संधी मिळालीच नाहीय. त्याची केवळ निवड केली जाते. तो संपूर्ण मालिकेत एखादा सामना खेळतो, तर उर्वरित सामन्यांसाठी त्याला संघाबाहेर बसावे लागते. त्यामुळे ज्या खेळाडूंची संघात निवड होते. त्यांना प्रत्यक्षात सर्व सामने खेळायला मिळतात की नाही यावरही खेळाडूंची कामगिरी अवलंबून असते. आपल्याला सर्व सामन्यात खेळता यावे अशी इच्छा सर्वच खेळाडूंची असते, असेही पाटील पुढे म्हणाले.

येत्या २२ सप्टेंबरपासून न्यूझीलंचविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात होणार असून, तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडच्या संघाची घोषणा याआधीच करण्यात आली आहे. मुख्य कसोटीआधी न्यूझीलंडचा संघ भारतात एक सराव सामना देखील खेळणार आहे. १६ ते १८ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या सराव सामन्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या १५ सदस्यीय मुंबईच्या संघात रोहित शर्माचा समावेश करण्यात आला आहे.