गोव्याचे संजय कवळेकर यांनी येथील कालिकादेवी सभागृहात आयोजित पश्चिम विभागीय राष्ट्रीय मानांकित अंध बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपदाचा मान मिळविला. महाराष्ट्राचे अमित देशपांडे हे द्वितीय स्थानी राहिले.

नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि राष्ट्रीय दृष्टिहीन संघ यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत सहा राज्यातील शंभरपेक्षा अधिकखेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारे २५ पुरूष आणि पाच महिला खेळाडूंची गुजरात येथे १४ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय ब स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यात महाराष्ट्राच्या अमित देशपांडे, सचिन वाघमारे, अमोल सकपाळ, विकास शितोळे, वैशाली सालावकर, अनिरूध्द खुंटे, दत्तात्रय वाडेकर, कार्तिक दामले, सुनील ससाणे, रोशन दिवारे, सतीश वाहुळे, आशिष रोकडे, तीजन गवर, शोभा लोखंडे, रितू टेंभूर्णीकर, मृणाली पांडे यांचा समावेश आहे.

रोटरी नाशिकतर्फे प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे १५००, १००० आणि ५०० रुपये अशी रोख पारितोषिके देण्यात आली. धनाजी काकडे आणि प्रविण पानतावणे यांनी प्रमुख पंच म्हणून भूमिका निभावली. भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. त्यांनी अंध खेळाडूंचा आवाज केंद्र शासनाकडे पोहचविण्याचे आश्वासन दिले.

अर्जुन पुरस्कार विजेते प्रविण ठिपसे यांनीही खेळाडूंना मार्गदर्शन केले. यावेळी भाजपचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, चांदवड चे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, कालिकादेवी संस्थानचे अध्यक्ष अण्णा पाटील, रोटरीचे पदाधिकारी उपस्थित होते. अखिल अंध बुद्धिबळ महासंघाचे पदाधिकारी मनीष थूल, स्वप्नील शाह, राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे डी. पी. जाधव, सचिन घोडेराव, जगदीप कवळ, जिल्हा संघटनेचे धनंजय बेळे, विनय बेळे, सुनील शर्मा आदी उपस्थित होते.