आशियाई आणि राष्ट्रकुल खेळांमध्ये पदक विजेत्या भारतीय महिला बॉक्सर सरिता देवीलाही करोनाची लागण झाली आहे. मणिपूरमधील इम्फाळ येथे राहत असलेल्या सरिता देवीचा करोना अहवाल काही दिवसांपूर्वी पॉझिटीव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वी सरिता देवाली ताप आणि घश्यात खवखव होत होती. यानंतर सरिता देवी आणि तिच्या पतीने स्थानिक कम्यूनिटी हेल्थ सेंटरमध्ये करोनाची चाचणी केली, ज्यात सरिता देवी आणि तिच्या पतीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

“काही दिवसांपूर्वी माझ्या वहिनीने बाळाला जन्म दिला. तिला आणि माझ्या भावाला भेटण्यासाठी मी त्यांच्या घरी गेले होते. त्यांच्या घरून आल्यानंतर मला ताप, सर्दी आणि घसा खवखळण्याची समस्या सुरु झाली. सुरुवातीला प्रवासामुळे हा त्रास जावणत असेल असं मला वाटलं, पण तीन दिवसांनंतर मला करोनाची सर्व प्राथमिक लक्षण जाणवत होती. खबरदारी म्हणून मी आणि माझ्या पतीने चाचणी केली, ज्यात आमचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सुदैवाने माझा ८ वर्षांचा मुलगा व त्याचे इतर भावंड यांना करोनाची लागण झालेली नसल्याचं निष्पन्न झालंय.” सरिता देवीने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना माहिती दिली.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ३ वेळा विजेतेपद, आशियाई खेळांमध्ये ५ पदकं अशी कामगिरी करणारी सरिता देवी ही भारतामधली प्रमुख महिला बॉक्सर मानली जाते. करोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर सरिता देवी आणि तिच्या पतीला इम्फाळ येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी भारताचे माजी बॉक्सर डिंगो सिंग करोना पॉझिटीव्ह आढळले होते. पण एका लढवय्याप्रमाणे डिंगो यांनी करोनावर मात केली. सरितानेही डिंगो यांचा आदर्श ठेवून करोनावर मात करुन दमदार पुनरागमन करण्याचं ध्येय ठेवलं आहे.