‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्या समोरच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी ‘लोकपाल’ म्हणून निवृत्त न्यायमुर्ती डी.के.जैन यांनी नेमणूक केली आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व पक्षकारांनी जैन यांच्या नावाला समंती दर्शवल्यामुळे न्यायालयाने जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. याचसोबत जैन यांनी तात्काळ पदाचा ताबा घ्यावा असे निर्देशनही न्यायालयाने दिले आहेत.

याआधी झालेल्या सुनावणीमध्ये या प्रकरणी निवाडा करण्यासाठी लोकपालाची नेमणुक करावी का यावरुन मत-मतांतर झाली होती. बीसीसीआयची बाजू मांडणाऱ्या मुकुल रोहतगी यांनी लोकपाल नेमणुकीला विरोध केला होता. बीसीसीआय ही खासगी क्रीडा संघटना असल्याचं रोहतगी यांनी म्हटलं होतं. मात्र महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने लोकपालाच्या नेमणुकीला विरोध दर्शवला नव्हता. मात्र आजच्या सुनावणीत सर्व पक्षकारांनी जैन यांच्या नावाला पाठींबा दर्शवला. यानंतर जस्टीस बोबडे आणि जस्टीस सप्रे यांच्या खंडपीठाने जैन यांच्या नेमणुकीचे आदेश दिले.

काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने लोकेश राहुल-हार्दिक पांड्या यांचं निलंबन मागे घेतलं होतं. यानंतर न्यूझीलंडविरुद्ध दौऱ्यात हार्दिकने सामन्यातही पुनरागमन केलं होतं. 24 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही लोकेश राहुल-हार्दिक पांड्याची निवड झाली होती. मात्र दुखापतीमुळे हार्दिक पांड्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे. हार्दिकच्या जागी रविंद्र जाडेजाची संघात निवड करण्यात आले.