सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीतील अखेरच्या कसोटी मालिकेची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा गुरुवारी होणार असून, गोलंदाजांची निवड करताना राष्ट्रीय निवड समितीची खरी कसोटी लागणार आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतील दोनशेव्या कसोटीनिशी निवृत्ती पत्करणार आहे. त्यामुळेच या ऐतिहासिक मालिकेकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे. हरयाणाविरुद्धच्या रणजी सामन्यात वेगवान गोलंदाज झहीर खानने पाच बळी घेत आपल्या तंदुरुस्तीची ग्वाही दिली आहे. त्यामुळे गोलंदाजांची निवड करताना निवड समितीचा कस लागणार आहे.
दुखापती आणि तंदुरुस्ती या कारणास्तव झहीर भारतीय संघापासून बराच काळ दूर आहे. डिसेंबर २०१२मध्ये इंग्लंडविरुद्ध झहीर आपल्या कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना खेळला आहे. परंतु फ्रान्समध्ये तंदुरुस्तीचा खास सराव केल्यानंतर आता ३५ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज झहीर पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी उत्सुक आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताचा वेगवान मारा झगडताना आढळत आहे. झहीरच्या समावेशामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावू शकेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत इशांत शर्मा आणि आर. विनय कुमार यांची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. भुवनेश्वर कुमारने मात्र आपली भूमिका चोख बजावली आहे.
 वेस्ट इंडिजनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या पाश्र्वभूमीवर संदीप पाटील आणि कंपनी सर्वात अनुभवी गोलंदाज झहीरसोबत उमेश यादव आणि शामी अहमदवर विश्वास टाकू शकेल. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघात असलेल्या अशोक दिंडाला डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंगलासुद्धा भारतीय संघात संधी मिळू शकते. सध्या एकदिवसीय मालिकेत फारसा प्रभाव न पाडू शकलेला आर. अश्विन मात्र आपले स्थान राखेल. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत अश्विनने २९ बळींसह मालिकावीर पुरस्कार पटकावला होता. त्या मालिकेत प्रग्यान ओझासुद्धा भारतीय संघात होता. मात्र तो एकही सामना खेळू शकला नव्हता. परंतु रवींद्र जडेजाने अष्टपैलू कामगिरी बजावताना २४ बळी घेतले होते. याशिवाय लेगस्पिनर अमित मिश्राचाही पर्याय निवड समितीपुढे असेल.
फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत मुरली विजयने भारताकडून सर्वाधिक ४३० धावा केल्या होत्या. तथापि, अनुभवी सलामीवीर वीरेंद्र सेहवागला अजूनही आपला अपेक्षित सूर गवसलेला नाही. त्यामुळे तामिळनाडूच्या विजयवरच शिखर धवनसोबत भारताच्या डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी असेल. याशिवाय तिसरा सलामीवीर म्हणून गौतम गंभीरबाबतसुद्धा साशंकता आहे.
मुंबईचे दोन गुणवान फलंदाज रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांच्या नावांचीही सकारात्मक चर्चा होऊ शकते. सध्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये रोहित भारताच्या सलामीची धुरा सांभाळत आहे. रहाणेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात दमदार पर्दापण केले होते.
दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर सलामीच्या स्थानांची निवड करताना अन्य काही पर्यायांचाही निवड समिती गांभीर्याने विचार करू शकते. मधल्या फळीतल्या बाकीच्या जागा जवळपास निश्चित आहेत. मधल्या फळीतील फलंदाज म्हणून सुरेश रैना आणि युवराज सिंगपेक्षा रोहित किंवा अजिंक्य यांच्यापैकीच एकाची वर्णी लागू शकते
 या मालिकेतील पहिली कसोटी ६ ते १० नोव्हेंबर या कालावधीत ईडन गार्डन्सवर तर दुसरी कसोटी १४ ते १८ नोव्हेंबरदरम्यान वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.